महाराष्ट्ररणधुमाळीसंपादकीय

राम… राम… राम…

महाराष्ट्रातील मविआचे घटक, पण राष्ट्रीय स्तरावरील संपुआचे आघाडीबाह्य मित्र असलेले काँग्रेस आणि शिवसेना या दोघांच्याही गोटात सध्या काय सुरू आहे, काही कळेनासे झाले आहे. रोज अशी काही घडामोड होते, की मतदार गोंधळून जातो. विशेषत: मविआचे सरकार गेल्यापासून तर गोंधळच गोंधळ आहे

महान काँग्रेस पक्षाचेच पाहा.‌ त्यांचे युवराज राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. (याच काळात राजस्थानात मात्र ‘काँग्रेस तोडो’ चे नाट्यप्रयोग सुरू आहेत, हा भाग वेगळा!) त्या निमित्ताने पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आपल्या नेत्याची तुलना प्रभू रामचंद्रांशी केली.‌ ते म्हणाले – नाहीतरी भाजपा राहुलजींना राजकुमार म्हणतातच. तेही रामासारखे भारत यात्रेवर निघाले आहेत. काँग्रेसला रामाचा आठव झाला, हे महत्त्वाचे.

अयोध्या रामजन्मभूमी खटल्यात याच काँग्रेसने ‘राम वास्तव नसून काल्पनिक पात्र आहे’ अशी भूमिका घेतली होती. तोच ‘कल्पनाविलास’ आता त्यांना आधार वाटू लागला, हाच रामाचा महिमा. रामाच्या नावाने दगडही तरतात म्हणे!

शिवसेनेत रोज नवा शोध लागतोय. २०१४ मध्येच काँग्रेस-राष्ट्रवादीकडे शिवसेनेचा मैत्रीचा प्रस्ताव आला होता आणि तो घेऊन येणाऱ्यांमध्ये एकनाथ शिंदेही होते, असा गौप्यस्फोट (खरं म्हणजे आगकाडी) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आठ वर्षांनी केला. त्याचा रोख दिसायला शिंदे, पण प्रत्यक्षात उद्धव ठाकरेंवर आहे, हे निष्ठावंतांना कोणी सांगावे ? हा प्रस्ताव शिंदेंचा असेल की ठाकरेंचा, याचे उत्तर शेंबडा पोरही देईल.

शिवसेनेत निर्णय कोणाचा असतो, हे साऱ्या जगाला माहीत आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-सेना युती तुटली होती. अखेर सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपने सरकार बनविले आणि काही महिन्यांतच शिवसेना पुन्हा युतीत परतली, हा इतिहास आहे. २०१९ मध्ये शिवसेनेने युती (निकालोत्तर) मोडली.

तेव्हापासून भाजपा सातत्याने सांगत आहे की, २०१४ पासूनच सेनेला आमच्यासोबत नांदायचे नव्हते. त्यावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीच आज शिक्कामोर्तब केले आणि उद्धव ठाकरेंना उघडे पाडले. त्यामुळे भाजपने चव्हाणांवर टीका करण्याऐवजी त्यांचे आभारच मानले पाहिजे. अशोकराव तुमच्या मदतीला धावून आले आहेत राजे हो…

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये