महाराष्ट्ररणधुमाळीसंपादकीय

कढीला ऊत…

शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे २०१४ सालापासून सूत जुळले होते आणि शिवसेनेला भाजपपासून दूर करण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न होता, हे मात्र सिद्ध होते. एकनाथ शिंदे हे ठाकरे यांनी दिलेले काम करणारे एकनिष्ठ शिवसैनिक होते हे अधोरेखित होते. त्यामुळे अशोक चव्हाण एकनाथ शिंदे यांना कोपऱ्यात घेरण्याचा प्रयत्न करतात की शिळ्या कढीला ऊत आणून आपल्यासाठी वाट मोकळी करतात, हे लवकर समजेल.

अशोक चव्हाण हे एकेकाळी मुख्यमंत्री होते. परदेशात शिकलेले. वडील शंकरराव चव्हाण यांचा मोठा वारसा असलेले काँग्रेसचे नेते. गेल्या आठवड्यापर्यंत ते काँग्रेसमध्ये राहतील की नाही असा संशय त्यांच्या बाबत व्यक्त केला जात होता. आजही त्यांच्या बाबत काँग्रेसजन त्यांच्यावर किती विश्वास ठेवतील, हा प्रश्न आहे.

पक्ष मोठा करण्यात त्यांचा फार मोठा वाटा नाही. असे असताना दोन दिवसांपूर्वी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल २०१४ सालातलं वक्तव्य केले. आता ते आजच्या घडीला कितपत लागू होत हा विचार त्यांनी केला असता तर ते बोलले नसते. मात्र बहुतेक सर्वच नेत्यांमध्ये निरर्थक बोलण्याची चढाओढ लागली असल्याने त्या वाहत्या पाण्यात त्यांनीही हात धुऊन घेतले.

दोन दिवसांची सवंग प्रसिद्धी मिळवून घेतली. अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्रिपद गेले त्यानंतर राजकारणातून ते बाहेर फेकले गेले होते. आपला विधानसभा मतदारसंघ ठाकठीक ठेवणे एवढेच त्यांचे काम होते. शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्यामुळे निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर गेलेली काँग्रेस चक्क सत्तेत आली आणि अशोक चव्हाणांना अच्छे दिन आले.

अशा परिस्थितीत त्यांनी त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी असताना पक्षबांधणी तर केलीच नाही, मात्र विधानसभेत अध्यक्षपदावर काँग्रेसचा माणूस बसवता आला नाही. ते आदर्श गृह घोटाळ्यात मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. आजही ते फार मोकळेपणाने स्वातंत्र्य उपभोगू शकत नाही म्हणून त्यांची काँग्रेस सोडण्याची तयारी सुरू आहे, होती.

मात्र अपात्रतेची कारवाई होऊ नये यासाठी ते थांबले. आता २०१४ सालात एकनाथ शिंदे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन आले होते हा त्यांच्या भाषेत गौप्यस्फोट त्यांनी केला असला, तरी जवळपास आठ वर्षांपूर्वीची आणि आजची परिस्थिती बदललेली आहे.

सन २०१४ शाळांतली निवडणूक हे प्रमुख चारही पक्ष स्वतंत्र लढले होते. चारही जणांना दुसऱ्या कोणाबरोबर जाण्याची मोकळीक होती. २०१९ सालात युती म्हणून निवडणूक लढवलेल्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर मिळतेजुळते घेत त्यांच्या भाषेत शिवसेनेचे सगळे आमदार सोबत घेत काँग्रेस – राष्ट्रवादी गुवाहाटीला, गोव्याला किंवा सुरतला न जाता दिल्लीत जाऊन मतदारांबरोबर गद्दारी केली.

शिंदे गटाने थोडे तरी आमदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत ठेवले आहेत. पण उद्धव ठाकरे यांनी एकही आमदार युतीतला दुसरा पक्ष भाजप याच्यासाठी ठेवला नाही. सगळेच पळवले. आणि खोक्यांशिवाय किंवा खोक्यांसाठी हे त्यांनाच माहिती. पण २०१४ सालात मात्र शिंदे उद्धव ठाकरे यांच्या संमतीशिवाय अशोक चव्हाण यांच्याकडे जाणे शक्य नाही. तो प्रस्ताव ठाकरे यांच्याकडे शरद पवार यांच्याकडून व्हाया संजय राऊत ते एकनाथ शिंदे असा प्रवास करता झाला असावा.

आज त्या प्रकरणाने शिंदे कसे शिवसेना किंवा भाजपच्या विरोधात वागत आहेत, वागले होते हे दाखवायचे आहे. त्या वेळी खरे तर अशोक चव्हाण यांना महाविकास आघाडीचे शिल्पकर होण्याचा मान घेण्याची संधी होती. पाच वर्षांनी शरद पवार यांनी ती घेतली. मग राजकारणात, दूरदर्शीपणात किंवा धडाडीने सामोरे जाण्यात अशोक चव्हाण कमी पडले हे मान्य केले पाहिजे.

त्यातून शिंदे नव्हे, तर उद्धव ठाकरे खलपुरुष असल्याचे आदर्श चव्हाण आता दाखवत आहेत. त्यातूनही आता शिळ्या कढीला ऊत आणून शिंदे यांची प्रतिमा खराब होईल असे आहे का? किंबहुना शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे २०१४ पासून सूत जुळले होते आणि शिवसेनेला भाजपपासून दूर करण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न होता हे मात्र सिद्ध होते.

एकनाथ शिंदे हे ठाकरे यांनी दिलेले काम करणारे एकनिष्ठ शिवसैनिक होते हे अधोरेखित होते. त्यामुळे अशोक चव्हाण एकनाथ शिंदे यांना कोपऱ्यात घेरण्याचा प्रयत्न करतात की शिळ्या कढीला ऊत आणून आपल्यासाठी वाट मोकळी करतात हे लवकर समजेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये