“कोणी मुर्खासारखं…”, गिरीश महाजनांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय गायकवाड यांचा हल्लाबोल

मुंबई | Sanjay Gaikwad – शिवसेनेचे (Shivsena) दोन गट पडण्यामागे भाजपचंच (BJP) मिशन होतं, असं वक्तव्य भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या या विधानाननंतर शिंदे (Shinde Group) आणि ठाकरे गटाकडून (Thackeray Group) विविध प्रतिक्रिया देण्यात आल्या. यामध्ये आता शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनीही गिरीश महाजनांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही क्रेडिट घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये, असं म्हणत संजय गायकवाड यांनी महाजनांवर हल्लाबोल केला आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
“कोणी मुर्खासारखं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला काहीही अर्थ नाही. शिवसेनेचे सर्व आमदार बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचे होते. आम्हाला मातोश्री आणि वर्षा बंगलाऱ्यावर प्रवेश नव्हता. कामासाठी बैठका होत नव्हत्या. त्यामुळे सगळे आमदार त्रास्त झाले होते. तर दुसरीकडे राष्ट्रावादी आणि काँग्रेस पक्षाची कामं जोमात चालू होती. आमचा स्थानिक पातळीवरील लढा हा राष्ट्रावादी आणि काँग्रेससोबत होता”, असं संजय गायकवाड म्हणाले.
“आमचा स्थानिक पातळीवरील जो संघर्ष सुरू होता तो थांबवण्यासाठी आम्ही कित्येक वेळा उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) तक्रार केली. मात्र शेवटपर्यंत ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडून बाहेर पडले नाहीत. शेवटी त्यांनी आमदार सोडले, मुख्यमंत्रीपद सोडलं मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडलं नाही. त्यामुळे आम्हाला बंडखोरीचा निर्णय घ्यावा लागला,” असंही संजय गायकवाडांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, “त्या काळात एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सर्व आमदारांना मदत केली. तसंच शिंदे यांना राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकीत जी वागणूक देण्यात आली, त्यामुळे सर्वांचा बांध फुटला. सर्वजण काहीही ठरलेलं नसताना अंगावरच्या कपड्यांवर बाहेर पडले. त्यामुळे कोणीही क्रेडिट घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. आम्हाला कोणी भूलवलं आणि आम्ही गेलो असं झालेलं नाही. स्वाभिमानानं आम्ही गेलो होतो. आम्हाला महाविकास आघाडी पसंद नव्हती. आम्हाला भाजप-शिवसेनेची युती आणि सन्मान महत्त्वाचा होता”, असं म्हणत संजय गायकवाडांनी गिरीश महाजनांवर अप्रत्यक्षपणे टीका केली.