फिचरलेख

एक तरी ओवी अनुभवावी

!!जय श्री राम!!
!!ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन!
!!अ.१३वा.”निरुपण विस्तार”!!

माऊलींनी श्लोक ११ चा ओवीविस्तार करताना. ओवी ६१५ ते ओ. ८६३ अशा २४८ ओव्यांमधून हे निरुपण केले आहे. अर्थात, यामध्ये पांच विषयांचा परामर्श माऊलींनी घेतला आहे.
(१) अध्यात्मज्ञान (२) तत्त्वज्ञान (३)ज्ञानाची लक्षणे (४) अज्ञानलक्षणे (५)ज्ञेयाचे वर्णन आणि या पाचांचे सार म्हणून “परमात्म वस्तु” हे शेवटचे श्लोक
निरुपण येते.
आता आपण अध्यात्मज्ञान या विषयावरील ओव्या पाहतो आहोत.
तरी परमात्मा ऐसें!जे एक वस्तु असे!
ते जया दिसे !ज्ञानास्तव!!६१५!!

माऊलींनी आत्मतत्त्वाला दृष्य स्वरुपातील वस्तु “अध्यारोपण” केले तरी आत्मा डोळ्यांनी पाहण्याची हाताने स्पर्श करण्याची गोष्ट नाही, याची जाणीव माऊलींना आहे. पण ज्ञानी माणूस तर्क, कार्यकारणभावाने आत्मा जाणून घेतो. वारा दिसत नाही, पण झाडांची पाने हलतात. म्हणजे न दिसणारी पवनशक्ती तर्काने जाणली जाते.
मी झोपलेलो असता माझा श्वास चालतो. माझ्या हृदय, फुफ्फुस, जठर यांचे कार्य चालू राहते, म्हणजे माझ्या देहात परमेश्वर शक्ती आहे, ज्याला आत्मा म्हटले जाते. यापुढील ओवीत परंपरेतील स्वर्ग, नवस, वगैरे भोगांचेमुळे ज्ञानमार्ग भक्त सोडून देतो.हे नको म्हणून आध्यात्मिक ज्ञान म्हणजेच ज्ञानमार्ग हे ठाम मत माऊली प्रस्तुत ओवी समूहात मांडतात.

तें एकवाचूनि आने!जिये भवस्वर्गादि ज्ञाने!
ते अज्ञान ऐसे मने!निस्चयो करी!!६१६!!
स्वर्गा जाणे हे सांडी!भवविषयी कान झाडी!
दे आत्मज्ञानीं बुडी!सद्भावाची!!६१७!!
भंगलिया वाटा शोधे!शोधूनिया अव्हाटे!
निघिजे जेवी निटे!राजपंथे!!६१८!!
तैसे ज्ञानजाता करि!
आघवेंचि एकीकडे सारी!
मग मन बुद्धि मोहरी!अध्यात्मज्ञानी!!६१९!!
म्हणे एक हेचि आथी!येर जाणणे हेचि भ्रांती!
ऐसी निकुरेसी मती!मेरु होय!!६२०!!
एवं निस्चयो जयाचा!द्वारी अध्यात्मज्ञानाचां!
ध्रुवो देवो गगनीचा!तैसा राहिला!!६२१!!
तयाचा ठायी ज्ञान!
या बोला म्हणसी व्यवधान!
ते ज्ञानी बैसले मन!तेंव्हाची तो!!६२२!!
भावार्थ ६१६ ते ६२२:

आध्यात्मिक आवड असणारा साधक भगवान श्रीकृष्ण यांना भजतात आणि भगवद्‌गीता उपदेशाप्रमाणे स्वर्ग आणि स्वर्गोपभोग त्याज्य मानतात. भगवत उपदेशापलीकडील सर्वज्ञान अज्ञान मानतात. स्वर्गप्राप्ती मार्ग, संसारिक समस्यांसाठी नवस बोलणे ते कानावरसुद्धा पडू देत नाहीत. आत्मज्ञान अभ्यासात ते रमून जातात. काम्यव्रतांच्या अतिरेकाने भगवद्‌गीता उपदेशाकडे दुर्लक्ष होते. गीतेच्या मार्गापलीकडील सर्व आडवाटा साधक सोडून देतो. कारण भगवंतांचा रस्ताच राजरस्ता आहे. ज्ञानमार्गाचा स्वीकार केल्यानंतर बाकी सर्व बाजूला ठेवले जाते. मनबुद्धी एकरुप होऊन केवळ अध्यात्मज्ञान ध्येय होते. आध्यात्मिक विषयांपलीकडे सगळे रस्ते भ्रम निर्माण करणारे भुलभुलय्या आहेत. म्हणून साधक अचल असा मेरू शिखरच होतो. उत्तर दिशा निर्देशित करणारा तो आध्यात्मिक आकाशातील ध्रुवतारा होतो. साधक कसा असावा, असे इतर लोक त्याच्यासंबंधी बोलतील. प्रस्तुत निरुपण आध्यात्मिक ज्ञानाचे महत्त्व वर्णन करतात.

प्रकाश पागनीस

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये