ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

यंदा आषाढी वारी पालखी सोहळ्यात संविधानाचा जागर

पुणे : कोविडविषयक निर्बंधांमुळे मागील दोन वर्षांपासून खंड पडलेली ज्ञानोबा-तुकोबांची पालखी यावर्षी मोठ्या उत्साहात आळंदी आणि देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अभिनव संकल्पनेतून यावर्षी पालखी सोहळ्यात ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाबरोबरच संविधानाचादेखील जागर करण्यात येणार आहे.
पालखी प्रस्थानाच्या वेळी आळंदी येथून पालखीसमवेतच संविधान दिंडी आयोजिण्यात आली असून २१ जून रोजी आळंदी येथून निघणारी ही संविधान दिंडी पालखी मार्गावर सर्वत्र संवैधानिक मूल्यांचा जागर, भजन, कीर्तन, अभंग आदींच्या माध्यमातून करीत १० जुलैला पंढरपूर येथे पोहोचणार आहे.

चर्‍होली फाटा येथे २१ जून रोजी दुपारी ३ वाजता दिंडीचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येईल. या दिवशी सायंकाळी संविधान जलसा व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ रोजी संविधान दिंडी विठोबा मंदिर भवानी पेठ पुणे येथे मुक्कामास येईल. यादरम्यान राज्यातील नामवंत विचारवंत सांस्कृतिक कलावंत, भजनी मंडळ आदींच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम घेतले जातील. पालखी मुक्कामस्थळाजवळ गुरुवारी (दि. २३) नाना पेठ येथे संविधान जलसा हा मुख्य कार्यक्रम आयोजिण्यात आला असून, या कार्यक्रमास मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह ज्येष्ठ नसिरुद्दीन शहा, नीलेश नवलखा, शबाना आझमी, नागराज मंजुळे, रत्ना पाठक, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांसह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

२४ जूनपासून ते १० जुलैपर्यंत पालखी सोहळ्यामध्ये संविधान दिंडी संमिलित होऊन, त्यामधून ठिकठिकाणी संविधान जलसा, संविधानावर व संविधानातील मूल्यांवर आधारित प्रवचने, कीर्तने, सप्तखंजिरी कीर्तन आदी उपक्रम सुरू राहतील. ठिकठिकाणी संविधान उद्देशिकावाचन व वाटप, अभंग व कीर्तनाच्या माध्यमातून संवैधानिक मूल्यांबाबत जागृती. संविधानातील हक्क व कर्तव्ये तसेच विविध परिशिष्ट कलमे आदींचे डिजिटल सादरीकरण, दृक-श्राव्य माध्यमातून लोकसंवाद वृक्षारोपण, योजनांच्या माहितीच्या घडीपत्रिकांचे वाटप इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये