बालगंधर्व मोहोत्सव विशेष – “राजेभोसले यांनी सात हजारांवरून सदस्यसंख्या पन्नास हजारांच्या पुढे पोहोचविली”: विक्रम गोखले

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची सात हजार सदस्यसंख्या असताना ती तब्बल ५४ हजारांवर नेत मेघराज राजेभोसले यांनी रंगभूमीची मोठी सेवा केली आहे. अध्यक्ष सक्रिय असला आणि निष्ठावान असला, की अशी परिवर्तने दिसून येतात, असे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी काढले. आज भाजप सांस्कृतिक पक्षाच्या वतीने आयोजिलेल्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन, उद्योजक किंमत अजबे आदी मान्यवर उपस्थित होते. सध्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरून गोंधळ सुरू आहे. काहींनी राजेभोसले यांच्या विरोधामध्ये पवित्रा घेऊन कलाक्षेत्रामध्ये राजकारण आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, त्यावर प्रतिक्रिया देताना श्री. गोखले यांनी सांगितले, की राजकारणाबद्दल मला फारसे माहीत नाही, पण मेघराज राजेभोसले यांनी जेव्हा पदभार घेतला तेव्हा सात हजार सदस्य होते, एवढी मोठी रंगभूमी आणि त्याचा प्रदीर्घ इतिहास हा केवळ काही लोकांपुरता मर्यादित होता.
त्यांनी महाराष्ट्रभर दौरे करत चित्रपट आणि रंगभूमीच्या सर्व कलाकारांना एकत्रित बांधत ही संख्या ५४ हजारांवर गेली आणि गेल्या अर्ध्या दशकांमध्ये प्रचंड काम उभारले, याचा मी स्वतः साक्षीदार आहे. अभिनेता सुशांत शेलार यांनी काल काही सदस्यांची बैठक घेऊन स्वतःला अध्यक्ष घोषित केले आहे, आता त्याचा वाद न्यायालयात पोहोचत आहे. श्री. गोखले यांचे हे विधान महत्त्वपूर्ण ठरत आहे. चित्रपट-रंगभूमी कलाकारांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांना हक्काचा निवारा मिळावा, त्यांच्याकरिता उपक्रमांसाठी एखादी जागा मिळावी, यासाठी श्री. गोखले यांनी आपल्या स्वकर्मा येथील कोट्यवधी रुपयांची सुमारे पाच एकर जागा ही चित्रपट महामंडळाला देऊ केली आहे.