अर्थविश्लेषण

बँक घोटाळ्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

आरबीआयचा अहवाल; रोज शंभर कोटींचे नुकसान

एखादा हप्ता थकला तरी सर्वसामान्य चिंताग्रस्त होतात. बँकही त्यांच्याकडून लवकरात लवकर पैसे वसूल करतात; मात्र दुसरीकडे गेल्या सात वर्षांमध्ये बँक घोटाळे किंवा फसवणुकीतून झालेलं देशाचं नुकसान पाहिल्यास आपले काही हजार रुपये त्यापुढे किती महत्त्वाचे आहेत, याचा विचार सर्वसामान्य व्यक्ती करीत बसेल. कारण बँक घोटाळ्यातून देशात दररोज शंभर कोटी रुपयांचे नुकसान होत आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक बँक घोटाळे किंवा फसवणूक महाराष्ट्रात झाली आहे.

मुंबई : बँक घोटाळा किंवा फसवणुकीच्या एकूण रकमेपैकी सुमारे ५० टक्के घोटाळे एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तमिळनाडूचा क्रमांक लागतो. या पाच राज्यांमध्ये गेल्या सात वर्षांत सुमारे दोन लाख कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. ती एकूण रकमेच्या सुमारे ८३ टक्के आहे. अहवालानुसार, एक एप्रिल २०१५ ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत देशभरात सुमारे अडीच लाख कोटी रुपयांची बँकिंग फसवणूक आढळून आली आहे.
या अहवालानुसार, फसवणूक प्रकरणांचा तत्पर अहवाल आणि प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे अशा घटनांमध्ये वर्षानुवर्षे घट झाल्याचं अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे.

फसवणूक प्रकरणांत घट
अहवालानुसार, २०१५-१६ या आर्थिक वर्षात ६७ हजार ७६० कोटी रुपयांच्या बँकिंग फसवणुकीची प्रकरणें नोंदविली गेली. २०१६-१७ या आर्थिक वर्षात हा आकडा ५९ हजार ९६६.४ कोटी रुपयांवर आला. पुढील दोन आर्थिक वर्षांमध्ये ४५ हजार कोटी रुपयांपेक्षा कमी बँक फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद झाली. २०१९-२० या आर्थिक वर्षात हा आकडा आणखी खाली येऊन २७ हजार ६९८.४ कोटी रुपयांवर आला.

त्याच वेळी, २०२०-२१ मध्ये १० हजार ६९९.९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीची प्रकरणं नोंदवण्यात आली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये हा आकडा ६४७.९ कोटी इतका राहिला. सरकारच्या सर्व प्रयत्नांनंतरही देशाची बँकिंग घोटाळ्यांतून सुटका होत नाही. त्यामुळे केवळ बँकांचंच नुकसान होत नाही, तर घोटाळेबाज करातून सर्वसामान्यांचे कष्टाचे पैसेदेखील हडप करतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये