अनावश्यक काढून टाकले की सगुण रूप साकारते; ‘बाप्पा विथ आई’ उपक्रमात प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांचे मुक्तचिंतन

पुणे | Pune News – प्रत्येक मुलाच्या हातामध्ये मातीचा गोळा आहे. त्यातील अनावश्यक भाग काढून टाकला आणि त्याला योग्य आकार दिला की, सुंदर गणेशमूर्ती बनते. आपल्या आयुष्याचे तसेच आहे, आपण आपल्या जीवनातील अनावश्यक भाग म्हणजे राग, लोभ, आळस, वाईट सवयी काढून टाकल्या की, आपल्या आतमध्ये असलेले देवत्व समोर येईल. तसेच आपल्या देखील गुणांची पूजा होईल, असे मुक्तचिंतन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी केले.
राष्ट्रसंचार (Rashtrasanchar) आयोजित ‘बाप्पा विथ आई’ (Bappa With Aai) संकल्पनेचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. हा कार्यक्रम रविवारी सिंहगड इन्स्टिटयूट स्प्रिंग डेल स्कुल, एरंडवणे कॅम्पस येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी त्यांच्यासोबत कार्यक्रमाचे अध्यक्ष गोसेवा आयोगाचे अध्यक्ष ना. शेखर मुंदडा (राज्यमंत्री दर्जा), कोहिनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल, आरपीआयचे राष्ट्रीय निमंत्रकी ऍड. मंदार जोशी, महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकर सेना शहर उपाध्यक्ष तन्मय मेमाने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अनिरुद्ध बडवे म्हणाले की, समाज उत्सव प्रिय आहे. या उत्सव प्रियतेमध्ये स्वतःच्या अभिव्यक्तीला वाव देण्याची संधी मिळाली तर या उत्सवाचा आनंद वाढेल. तसेच आपल्या आईसोबत गणराय साकारत असताना हॅप्पी पॅरेंटिंगचे देखील संस्कार घडत जातील. या सर्वांचा विचार करून नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्याच्या हेतूने ही संकल्पना आम्ही राबवली यंदा दुसऱ्या वर्षी देखील याला मोठा प्रतिसाद मिळला आहे.
डॉ. शेखर मुंदडा यांनी सांगितले की, समाज बदलतोय आणि तो अधिक चांगुलपणाकडे जातोय. पूर्वी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनायच्या त्या निसर्गाला हानिकारक होत्या. आपण आता मातीच्या आणि शाडूच्या गणपतीपर्यंत आलो. पण आपल्याला यापुढे गोमय गणेशापर्यंत जायचे आहे. पुढील वर्षी गोमय गणेशाची भव्य कार्यशाळा घेऊन, संपूर्ण पुण्याला यामध्ये सहभागी करा. गोसेवा आयोग यामध्ये सक्रिय सहभाग घेईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
गोमय गणेशाच्या माध्यमातून गो उत्पादनाला चालना मिळेलच परंतु महाराष्ट्राचे ग्रामीण अर्थकारण मोठ्या प्रमाणामध्ये बदलण्याची शक्यता आहे. आपल्याला या महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचे असेल तर शेतकऱ्याचा पशुपालकाचाही विचार केला पाहिजे. त्याला आपल्या शहरी अर्थकारणामध्ये समाविष्ट करून घेतले पाहिजे. म्हणजे या राज्याचा सर्वांगीण विकास घडेल. यावेळी उपस्थितांचा सन्मान राष्ट्र संचार चे मुख्य संपादक अनिरुद्ध बडवे आणि संचालिका अंजली बडवे यांनी केला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक उपसंपादिका सारिका रोजेकर यांनी केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षक विद्या रेपाळ, समन्वयक प्रिया देवधर, तन्मय मेमाने, ऍड. मंदार जोशी, युवासेना शहर प्रमुख नीलेश गिरमे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सरचिटणीस गिरीश गुरनानी, सामाजिक कार्यकर्ते पराग ढेणे आणि राष्ट्रसंचारचे सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य महत्वपूर्ण ठरले.