“गुजराती, राजस्थानांच्या बळावर मुंबई देशाची आर्थिक राजधानी”- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई | Bhagat Singh Koshyari Controversial Statement – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे असं म्हणत विरोधकांसह सामान्य नागरिकांनी त्यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत. गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे. काल (29 जुलै) मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचं नाव देण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांचं हे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, त्यांना नारळ द्या अशी मागणी आता विरोधकांनी केली आहे.
यावेळी भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.”
दरम्यान, जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उद्घाटन सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी प्रामुख्याने उपस्थित होते.