भाऊसाहेब शिंदे यांचा ‘रौंदळ’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
गजानन पडोळ दिग्दर्शित अभिनेता भाऊसाहेब शिंदेच्या ‘रौंदळ’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. यातील भाऊसाहेबांच्या रफ-अँड-टफ लूकने चाहत्यांपासून ते चित्रपटसृष्टीपर्यंत सर्वांचीच उत्सुकता वाढवली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेची घोषणा करण्यासाठी चित्रपटाचे नवीन पोस्टर जारी केले. हा चित्रपट ३ मार्च २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या पोस्टरपासूनच हा चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे. पहिल्या पोस्टरमधील भाऊसाहेबांच्या लूकला त्यांच्या चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.
दिग्दर्शक गजानन पडोळ म्हणाले, “एका सत्य घटनेवर आधारित ही कथा आहे, गावातल्या खऱ्या घटनांसोबत इतरही अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. आमची संपूर्ण टीम ‘रौंदळ’च्या माध्यमातून एक संगीतमय चित्रपट प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे”.
या चित्रपटात भाऊसाहेबांसोबत नेहा सोनवणे यांनी अभिनय केला आहे. या चित्रपटातील ‘मन बहारला…’ हे रोमँटिक गाणे काही दिवसांपूर्वीच रसिकांच्या पसंतीस उतरले असून या गाण्याला संगीत रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटात यशराज डिंबळे, सुरेखा डिंबळे, शिवराज वाळवेकर, संजय लकडे, गणेश देशमुख आणि सागर लोखंडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.