सरस्वतीचे वरदान लाभलेले पुस्तकांचे गाव भिलार
![सरस्वतीचे वरदान लाभलेले पुस्तकांचे गाव भिलार WhatsApp Image 2022 07 16 at 1.25.00 PM 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/07/WhatsApp-Image-2022-07-16-at-1.25.00-PM-1-780x470.jpeg)
भिलार हे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव
तत्कालीन मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला प्रकल्प.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राज्य मराठी विकास संस्थेचा प्रकल्प.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महाबळेश्वर आणि पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणांजवळचे गाव.
राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर प्रसिद्ध झालेला आणि जगाच्या नकाशावर पोहोचलेला अभिनव प्रकल्प.
हा प्रकल्प म्हणजे शासनाचा पुढाकार आणि गावाचा सहभाग याचे उत्कृष्ट उदाहरण.
पुस्तके ठेवण्यासाठीची जागा घरमालक, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन ह्यांच्याकडून प्रकल्पाला विनामोबदला उपलब्ध.
भिलार हे स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठीही प्रसिद्ध असलेले गाव.
भिलार धबधबा, घनदाट वनराई, पक्ष्यांचा किलबिलाट असे निसर्गरम्य गाव.
थंड व स्वच्छ हवा आणि नीरव शांतता यांचा अनुभव देणारे गाव.
ग्रामस्थांचा उत्साह, औदार्य आणि आदरातिथ्य यांचीही अनुभूती देणारे गाव.
१५००० पुस्तकांचा अद्भुत खजिना… वाचण्यासाठी विनामूल्य उपलब्ध.
पुस्तकांचे गाव याबद्दल बऱ्याच वेळा ऐकले होते, पण म्हणजे नक्की काय ते कळत नव्हते. पुस्तकांचे गाव – भिलार अशी पोस्ट गुगलवर टाकली होती. त्या गावाबद्दल मला अजून माहिती मिळावी, म्हणून या गावाला मी आवर्जून भेट दिली. भिलार या गावात पुस्तकांबद्दल नक्की काय संग्रह केला होता, हे पाहणे मला औत्सुक्याचे वाटत होते. या उपक्रमाची दै. ‘राष्ट्रसंचार’च्या वाचकांना या भारतातील पहिल्या पुस्तक गावाची माहिती व्हावी, म्हणून सादर केलेला हा विशेष लेख…
भिलार पुस्तकांचे जगातील दुसरे गाव आहे. पहिले गाव ब्रिटनमध्ये हे-ओन-वे नावाचे आहे.
थंड हवेच्या ठिकाणी वसलेले भिलार हे गाव यापूर्वी स्ट्रॉबेरीच्या पिकामुळे ओळखले जायचे. आता पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे. भिलारवासीयांनी यानिमित्ताने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात आपली आगळीवेगळी ओळख प्रस्थापित केली आहे.
पूर्वी स्ट्रॉबेरीसाठी आणि सध्या पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले हे भिलार गाव महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणापासून आठ किमी अंतरावर आहे. अवघा दोन किमी विस्तार असलेल्या या छोट्याशा, पण टुमदार गावाने भारतातील पहिले पुस्तकांचे गाव होण्याचा मान पटकावला आहे. पुस्तके आणि साहित्यासंदर्भातील ओळख असल्यामुळे याबरोबरच येणारा सुसंस्कृतपणा गावात फिरताना पदोपदी जाणवतो. गावातील काही घरांनी आपल्या घरातीलच एका खोलीचे ग्रंथालय बनवले आहे.
अतिशय नेटकेपणे ठेवलेली एकेका विषयावरील पुस्तके, तिथेच बसून वाचनाची उत्तम सोय, वाचनासाठी आवश्यक असे वातावरण, घरातील व्यक्तींचे प्रसन्न, अगत्यपूर्ण सहकार्य या गोष्टी अनुभवून रसिक-वाचकांचे मन प्रसन्न होते. आपण स्वतः पुस्तकांच्या कपाटांमधून, रॅक्सवरून पुस्तके घेऊन हाताळू शकतो. हे सर्व संपूर्णपणे निःशुल्क आहे. प्रत्येक पुस्तकालयात सुबक अशी पुस्तकसूची, अभिप्रायवही, वर्तमानपत्रातील भिलारसंबंधित बातम्यांची कात्रणे असलेली चिकटवही असे सर्व ठेवलेले असते.
कादंबऱ्या, विनोदी, ऐतिहासिक, नियतकालिके, दिवाळी अंक, बोलकी पुस्तके अशा ३० पद्धतींनी वर्गीकरण केले आहे. प्रकल्प सुरू झाल्यापासून सुमारे १५,००० पुस्तके संग्रही आहेत. सर्व पुस्तके फक्त मराठीतीलच आहेत. पुस्तकविक्रीचे दुकान मात्र एकच आढळले. एक प्रकल्प कार्यालयही आहे. साहित्यविषयक कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी एक नाट्यगृहही आहे. भिलार गावात आता एक अभिनव संकल्पना पुस्तकप्रेमींसाठी रुजू झाली आहे. कल्पना तशी साधी आहे, पण अनोखी आहे. इथे या, पुस्तके हाताळा, चाळा, वाचा… तेदेखील अगदी मोफत. थोडीथोडकी नव्हे, तर जवळजवळ १५००० पुस्तके… या पुस्तकांची व्यवस्था त्यांच्या त्यांच्या साहित्यप्रकारानुसार गावातील वेगवेगळ्या २२ ठिकाणी केली आहे.
स्वातंत्र्यचळवळीतील गावाचा सहभाग, समृद्ध, ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी, स्वच्छतेचा आग्रह, पर्यटक निवासाची व्यवस्था, शासकीय योजनांमध्ये सहभागी होण्यासाठीचा ग्रामपंचायतीचा पुढाकार, या प्रकल्पाबाबत गावकऱ्यांची उत्साही भूमिका या सर्व घटकांचा विचार करून, या प्रकल्पासाठी महाबळेश्वर तालुक्यातील भिलार या गावाची निवड करण्यात आली.
कथा, कादंबरी, कविता, चरित्र-आत्मचरित्र अशा रूढ साहित्यप्रकारांसोबतच विज्ञान, क्रीडा, नियतकालिके, विविध कलांविषयक, परिवर्तन चळवळ, निसर्ग-पर्यटन-पर्यावरण, दिवाळी अंक, लोकसाहित्य, मराठी भाषा व संस्कृती आणि छत्रपती शिवाजीमहाराज व शिवकालीन इतिहास अशा वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारांची विविध घरांत मेजवानी दिली आहे.
मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात अनेकांनी योगदान दिले आहे. प्रामुख्याने भिलारवासीयांनी सरकारच्या या पुढाकाराला सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुळातच निसर्गरम्य असलेल्या या गावात सुमारे ७५ चित्रकारांनी गावातील २५ ठिकाणे आपल्या कलेच्या माध्यमातून सुंदररीत्या रंगवली आहेत.
प्रकल्पाच्या उद्दिष्टांना अनुरूप दृश्यात्मकता प्राप्त करण्यासाठी ठाणे येथील स्वत्व या स्वयंसेवी समूहाच्या एकूण ७५ स्वयंसेवकांच्या गटाने दि. १४, १५ व १६ एप्रिल २०१७ रोजी सुमारे १० हजार चौमीएवढ्या मोठ्या प्रमाणात अथकपणे भित्तीचित्रे रंगवून सजावट केली. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे, सातारा जिल्हा, इंदूर अशा विविध ठिकाणांहून चित्रकार या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. यामध्ये कला महाविद्यालयांतील आजी-माजी प्राध्यापक, आजी-माजी विद्यार्थी आणि हौशी कलाकार सहभागी होते.
या सर्जनशील कामात गावातील आबालवृद्धांचा सक्रिय सहभाग, कलाकार व ग्रामस्थ यांच्यामध्ये मैत्री व कलाकारांना घराघरांमधून चहा, न्याहरी, भोजन व निवासव्यवस्था असे विशेष प्रसंग या काळात भिलारमध्ये घडले आहेत. या गावातून फिरताना गावातील भिंतींवर, घरांवर पुस्तकांच्यासंदर्भातीलच सुंदर चित्रे, कार्टून्स दिसतात. आपल्या पु. लं.चे एक कार्टून तर सेल्फी पॉइंट म्हणून प्रसिद्ध झाले आहे. गावात कुठल्या घरात, कुठल्या विषयाची पुस्तके आहेत, त्या स्थळांचा एक नकाशाही लावला आहे.
त्यामुळे आपल्याला ते शोधणे सहज सोपे होते. या नव्या, अनोख्या, कल्पक व उत्साहवर्धक विचाराचे प्रसारमाध्यमे, साहित्यिक आणि सामान्य जनतेनेही स्वागत केले. साऱ्यातूनच १ मे २०१७ रोजी भिलार पुस्तकांचे गाव म्हणून नावारुपास आले. फेब्रुवारी २०१७ मध्ये प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर गावाची निवड, प्रकल्पाची नेमकी संकल्पना इत्यादींबाबत विचार झाले, चर्चा झाल्या आणि निर्णय घेण्यात आले.
पुढे दिलेल्या टप्प्यांमधून प्रवास करीत हा प्रकल्प आकारास येऊन दिनांक ४ मे २०१७ रोजी याचे लोकार्पण झाले. पुस्तक निवड समितीने निवडलेली पुस्तके भिलार येथे पोहोचल्यानंतर साहित्यप्रकारनिहाय सर्व पुस्तकांचे वर्गीकरण करण्यात आले. त्याच्या स्वतंत्र हस्तलिखित व संगणकीकृत सूची तयार करण्यात आल्या. या कामात शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबतच शिक्षक, ग्रामस्थ, गावातील तरुण-तरुणी यांनी सार्थ सहभाग नोंदवला. लोकसहभागातून स्ट्रॉबेरीची ओळख असणारे भिलार आता पुस्तकांचे गाव म्हणून नावलौकिक मिळवत आहे.