संडे फिचर

जगातल्या पर्यटकांना भुरळ घालतोय ‘भोगवे बीच’

कोकण म्हणजे पृथ्वीतलावरचा ‘स्वर्गच. निसर्गानं तिथं मुक्तहस्ताने उधळण केलीय. प्रत्येकाने बघताक्षणीच त्याच्या प्रेमात पडावं. या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा नावातच दुर्ग असल्यानं विविध किल्ले इथं बघायला मिळतात. आंबा, नारळ, सुपारी, काजूच्या बागा व फणसागत बाहेरून काटेरी तर आतून गोड गर्‍यांप्रमाणे असणारा इथला प्रेमळ माणूस. कोकण सोडून कुठं सहजासहजी मिळणार नाही.

जिल्ह्याला खूप मोठी समुद्रकिनारपट्टी आसल्यानं तिथं कायम पर्यटकांची वर्दळ. दोन वर्षांपूर्वी जगातल्या सर्वात प्रतिष्ठेच्या म्हणजे ऑस्कर पुरकाराच्या बरोबरीच्या ब्लू फ्लॉग मानांकनासाठी देशातून ८ व महाराष्ट्रातून फक्त एका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे या बीचची निवड करण्यात आली आणि लाखो लोकांच्या नजरा भोगवेकडे लागल्या. कसा असेल भोगवे? वेंगुर्ले तालुक्यातून भोगवे ३० ते ४० किलोमीटर आहे. जाताना रस्त्याच्या दुतर्फा आंबा, नारळ, सुपारी, काजूच्या बागांची घनदाट झाडी. अरुंद रस्ते, तीव्र उतार, तर कधी उभी चढण. प्रत्येक ५० फुटावर वाकडी वळण. गाडीच्या चालकाची परीक्षा घेणारी. काही ठिकाणी तर आपण कुठल्या गावात जातोय का? रस्ता चुकून जंगलात जातोय का असं वाटतंय.

पण प्रवास करताना कौतुक करावं वाटतं, सिंधुदुर्गच्या बांधकाम विभागाचं आणि लालपरीचं. कारण काही ठिकाणी रस्ता इतक्या अवघड ठिकाणी केलाय की, तो कसा केला असावा, हा प्रश्न पडतो. गाव तिथं रस्ता व रस्ता तिथं एसटी. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवते. अर्ध्या किलोमीटरवर लहानलहान गाव, ज्या रस्त्यावर लहान वाहन सरळ जाणार नाहीत अशा ठिकाणी एसटी जाते. प्रवाशांची काळजी घेत तीही वेळेत!

गावच्या शिवेवरूनच नारळाच्या बागांमध्ये वसलेलं शे-पाचशे लोकसंख्येचं भोगवे गाव नजरेस पडलं. समुद्रकिनार्‍यावर जाण्याआधी ग्रामपंचायतीने माहिती देणारे फलक दिसले. कपडे बदलायला चेंजिंग रूम, पिण्याचं पाणी, स्वच्छता ते सुरक्षा व कुठल्या दिवशी किनारा साफसफाई करायचा व केलेल्या विविध कामांची माहिती. बीचवर पाऊल टाकताच भोगवेचीच निवड किती योग्य आहे हे लक्षात येतं. कचरा करण्यात व नियम न पाळण्यात आम्ही भारतीय चांगलेच माहीर. इतर किनार्‍यावर कचरा, दारूच्या, पाण्याच्या बाटल्या, शिळेकुजके खाद्यपदार्थ, मेलेली जनावरं, मासेमारीमुळे घाण झालेलं पाणी, तुटक्या नौका, जाळ्या, अस्थीविसर्जन व जवळपास लोकवस्ती मोठी असेल तर तिची घाण समुद्रात.

अथांग समुद्र, निळेशार पाणी, दूरवर पसरलेली स्वच्छ वाळू, बाजूला असणारी नारळीची वाकलेली झाडे भोगवेच्या समुद्राला नमन करीत होती. रो रो वार्‍याच्या वेगानं येणार्‍या लाटा जांभा खडक अखंडपणे आपल्या अंगावर घेत होता. पाणी स्वच्छ तर कचरा टाकायला गावानं बाजूला कचराकुंड्या ठेवल्या होत्या. बसायला खुर्च्या ठेवल्या होत्या. अशा या सर्वांगसुंदर, निसर्गसंपन्न ठिकाणावर निवतीचा किल्ला शेकडो वर्षे जागता पहारा देत होता. कोचर गावच्या हद्दीत छत्रपती शिवरायांनी टेकडीवर बांधलेला हा ऐतिहासिक किल्ला आज दुर्लक्षामुळे अखेरच्या घटका मोजतोय.

निवतीच्या किल्ल्यावरून भोगवेची मनमोहक, रम्य चौपाटी दिसते. निवतीच्या समुद्रात ‘डॉल्फिन’ माशाच्या झुंडी बघता येतात. डॉल्फिनचे नृत्य पाहाण्याचा आनंदही अनुभवता येतो. यांत्रिकी होड्यांमधून समुद्र सफर करत ‘डॉल्फिन’चे नृत्य पाहाता येते. शांतता असल्याने या ठिकाणी वेळ कसा जातो हे कळत नाही. ब्लू फॉग मानांकनासाठी जगातील सर्व समुद्रकिनारे बघितले जातात. मानांकन देताना पाण्याचा दर्जा, किनार्‍याची स्वच्छता आणि पर्यटकांची सुरक्षितता हे मुद्दे लक्षात घेतले जातात. भारतातून आठ तर महाराष्ट्रातून फक्त भोगवेची निवड करण्यात आलीय. महाराष्ट्रासाठी ही गौरवाची बाब आहे.

हे मानांकन मिळणार अशी खात्री गावकर्‍यांना आहे. भारताला नाके मुरडून परदेशातील किनारे आम्हाला आवडतात. पण जगाने दखल घ्यावी असा किनारा आपल्या महाराष्ट्रातही आहे. हे ब्लू फॉगनंतर माध्यमांनी सांगितल्यावर समजलं. भोगवे समुद्र जवळ बीच रिसॉर्ट्स व राहायला हॉटेल्स आहेत. वेंगुर्ले व कुडाळ बसस्थानकांतून थेट बीचपर्यंत बस आहे. अशा या भोगवेस तुम्हीही एकदा भेट द्याच. पण हो… भोगवेच्या सौंदर्याला कुठलीही बाधा येणार नाही याची काळजी घेऊन!

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये