इतरक्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूरात शिंदे कुटुंब आत्महत्या प्रकरणी मोठी कारवाई!

कोल्हापूर | कोल्हापूरच्या गडहिंग्लजमधील अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदे यांनी पत्नी आणि मुलासह दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. असा विचित्र प्रकार घडल्याने कोल्हापूरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेसह तिच्या पोलीस अधिकारी असलेल्या प्रियकराला गडहिंग्लज पोलिसांनी अटक केली आहे. संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणात नगरसेविकेसह पोलीस अधिकाऱ्याचं नाव समोर आल्यानं लोकांमध्ये संताप व्यक्त होतोय. दरम्यान ही घटना घडल्यापासून शुभदा पाटील आणि राहुल राऊत हे दोघेही फरार होते. रविवारी रात्री गडहिंग्लज पोलिसांनी त्यांना सोलापूरमधून अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात खाद्यतेल, बेकरी उत्पादनात नामांकित समूह असलेल्या अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी शुक्रवारी रात्री आपल्या पत्नी आणि मुलासह आत्महत्या केली. आधी विषारी औषध प्राशन करून त्यानंतर गळ्यावर सुरी फिरवून शिंदे यांनी आपल्यासह पत्नी आणि मुलाचे जीवन संपवलं. शनिवारी सकाळी शिंदे यांच्या बेडरूमचा दरवाजा उशिरापर्यंत न उघडल्यामुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला. संतोष शिंदे यांच्यावर गडहिंग्लजमधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका शुभदा पाटील यांनी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. यासंदर्भात कर्नाटकातील संकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे. याच गुन्ह्यात संतोष शिंदे यांना महिन्याभरापूर्वी जेलवारी देखील करावी लागली होती.

संतोष शिंदे यांच्या आत्महत्येनंतर गडहिंग्लज परिसरात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका शुभदा पाटील यांच्या विरोधात मोठा संताप व्यक्त होतोय. शिंदे यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या तसेच शिंदे कुटुंबाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पाटील यांच्यावर कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

गडहिंग्लजमधील शिष्टमंडळाने कोल्हापुरात आमदार हसन मुश्रीफ यांच्यासोबत पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. यावेळी या प्रकरणात विशेष सरकारी वकील नेमावा अशी मागणी शिष्टमंडळातील शिंदे यांचे नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी केली आहे. याला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या संदर्भातील सूचना देणार असल्याचं आश्वस्त केलंय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये