पुणे महानगरपालिकेत कामे मिळवण्यासाठी ठेकेदारांमध्ये स्पर्धा; कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

पुणे महापालिकेत ठेकेदारांमध्ये काम मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. पथ विभागाच्या निविदा या मोठ्या रकमेच्या असतात. हे काम मिळाल्यास त्यांना मोठ्या रकमेचे काम केल्याचा अनुभव मिळतो व त्या आधारावर ते पुढच्या आणखी मोठ्या रकमेचे टेंडर भरण्यास पात्र ठरतात. त्याच प्रमाणे सरकारकडे व महापालिकेकडे काम जास्त मिळत नसल्याने प्रत्येक निविदेसाठी मोठी स्पर्धा होते. ठेकेदाराला कंपनीचा खर्च भागविण्यासाठी कमी नफा झाला तरी काम मिळवणे आवश्यक असते असे अधिकारी सांगत आहेत.
तर काही ठेकेदार कमी रकमेच्या निविदा भरून त्यांची रिंग यशस्वी करून आपसांत कामे मिळतील अशी व्यवस्था करतात. शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने दुरुस्ती व डांबरीकरणासाठी महापालिका प्रशासनाने १६ कोटी ३८ लाख रुपयांचे टेंडर काढले आहेत. हे टेंडर २० ते ३५ टक्क्यांपर्यंत कमी दराने आल्या आहे.त्यामुळे ठेकेदारांकडून चांगल्या दर्जाची कामे केली जातील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शहरात पाणी पुरवठा, सांडपाणी वाहिनी, पावसाळी गटार, मोबाईल कंपन्यांच्या केबल, गॅस वाहिनी टाकणे यासह अन्य कारणासाठी रस्ते खोदले जातात. काम झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी डांबर टाकून हे खड्डे बुजविले जातात. पण काही दिवसांनी खोदलेल्या रस्त्याचा भाग खचल्याने रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात होतात. तसेच पावसाळ्यामध्ये अनेक रस्त्यांवर खड्डे पडतात, खडी निघून गेल्याने चाळण झालेली असते.
पावसाळ्यात महापालिकेकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. पण तरीही रस्ते ओबडधोबड, असमान पातळीमध्ये असल्याने वाहनचालकांना त्याचा त्रास होतो, वाहतुकीची गती मंदावते. विशेषतः अशा रस्त्यांचा सर्वाधिक त्रास दुचाकीस्वारांना होतो. पथ विभागाने शहरातील जवळपास सर्वच भागातील प्रमुख रस्त्यांसह अन्य रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यातील पात्र ठेकेदारांचे प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आलेले आहेत.