पूजा भट्ट आधी पुनीत सुपरस्टारची बिग बॉसच्या घरात एण्ट्री; पहा बिग बॉस ओटीटी-2 ची पहिली झलक

Bigg Boss OTT 2 : छोट्या पडद्यावरील सर्वात हिट शो बिग बॉस आता ओटीटीवर आला आहे. बिग बॉस ओटीटी-2 सीजन कालपासून सुरू झाला आहे. ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी जिओ सिनेमा अॅपवर एक व्हिडीओ जारी करून स्पर्धकांची पहिली झलक दाखवली आहे. मागच्या वेळी या शोचा पहिला सीझन करण जोहरने होस्ट केला होता. मात्र, यावेळी टीव्हीप्रमाणे सलमान खान ओटीटीवरचा शो देखील होस्ट करणार आहे. बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनची घोषणा झाल्यापासून, यावेळी कोणते कलाकार ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात प्रवेश करणार आहेत, हे जाणून घेऊयात.
बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट बिग बॉस ओटीटी २मध्ये सहभागी होणारी १३वी स्पर्धक आहे. पूजा बिग बॉसच्या इतर स्पर्धकांसोबत टक्कर देणार आहे. तिची बिग बॉसच्या घरातील एण्ट्री ही चाहत्यांसाठी धक्काच आहे. पूजा आधी पुनीत सुपरस्टारने बिग बॉसच्या घरात एण्ट्री घेतली आहे. तो एक सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर आणि कॉमेडियन आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तो बिकिनी घालण्यासही मागे-पुढे पाहणार नाही. त्याचे आजवर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
‘बिग बॉस ओटीटी-2’ मध्ये यावेळी स्पर्धकांसाठी ही संकल्पना खूपच वेगळी आणि वेधक असणार आहे. यंदा स्पर्धकांना जंगल थीम असलेल्या घरात राहावे लागणार आहे. स्पर्धकांना या घरात जगण्यासाठी सर्व्हायव्हल किट देण्यात येणार आहेत. या एका किटमध्ये आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी उपस्थित असतील. शोमधील स्पर्धकांचा प्रवास जंगलापासून सुरू होणार आहे. या ठिकाणी सोफा, लक्झरी बेड नसणार आहे. तर, सुसज्ज बाथरूम आणि स्वयंपाकघर देखील नसणार आहे. स्पर्धकांना त्यांना दिलेल्या सर्व्हायव्हल किटमधून चरितार्थ करावा लागणार आहे.