औरंगाबादमधील प्रसिद्ध यूट्युबर तरूणी बेपत्ता झाल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू

औरंगाबाद | Youtuber Missing – औरंगाबाद येथील एक प्रसिद्ध यूट्युबर बेपत्ता झाली असून सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. युट्यूबर बिंदास काव्या कालपासून (शुक्रवार) अचानक बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी तिच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली असून दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे. तर पोलिसांकडून काव्याचा शोध घेतला जात आहे.
औरंगाबाद शहरात राहणारी प्रसिद्ध यूट्युबर बिंदास काव्या शुक्रवारपासून अचानक बेपत्ता झाली आहे. मित्र-कुटुंबीयांकडे तिची विचारपूस केली असता कुठेही तिचा पत्ता लागला नाही. बिंदास काव्या कमी वयात यूट्युबवर चांगलीच प्रसिद्ध आहे. तिचे लाखो फॉलोअरर्स आहे. मात्र शुक्रवारी ती घरी परतली नसल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी सर्वत्र शोधाशोध केली. पण तिचा काहीच पत्ता लागला नाही.
दरम्यान, बिंदास काव्याच्या आईने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात आमची मुलगी कधीही एकटी राहत नाही. एवढ्या वेळ ती एकटी राहू शकत नाही. त्यामुळे तिला कुठंही पाहिलं तर आम्हाला माहिती कळवा असं आवाहन केलं आहे.
