भाजप सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करणारा पक्ष
इंदापूर : भाजप हा सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करणारा पक्ष आहे. भाजपमुळे देशातील प्रत्येक समाजाचा विकास झालेला असून, त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळत आहे. भाजप आता अॅक्शन मोडमध्ये असून, स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी येणार्या सर्व निवडणुकांची तयारी भाजपने सुरू केली आहे, असे प्रतिपादन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. इंदापूर येथे राधिका रेसिडेन्सी क्लब येथे इंदापूर तालुका भाजपच्या नूतन पदाधिकार्यांचा पदग्रहण समारंभ रविवारी हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता आहे. आरक्षण मिळण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दाखवलेल्या नाकर्तेपणाचा यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. मात्र भाजप निवडणुकीत ओबीसींना
२७ टक्के आरक्षण देईल.
हर्षवर्धन पाटील,
भाजप नेते
जिल्हा परिषद, पंचायत समिती नगरपालिकांसाठी प्रभाग रचना निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे व्हावी यासाठी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना आम्ही पत्र दिले आहे. यामध्ये कोणास हस्तक्षेप करता येत नाही. जर यामध्ये कोणी हस्तक्षेप केला तर विविध मार्गाने हस्तक्षेपाचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, असा इशारा हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिला. भाजप हा जनहिताची कामे करणारा व तळागाळापर्यंत पोहोचलेला, जगामध्ये व देशामध्येही सर्वांत जास्त सदस्य संख्या असणारा पक्ष आहे. इंदापूर तालुक्यात भाजपची गाव तिथे शाखा काढण्यात येणार असून, आगामी काळात भाजप संपर्क अभियान राबविणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. भाजपमध्ये कार्यकर्ता महत्त्वाचा असून, काम करणार्या कार्यकर्त्यांची दखल पक्षात न मागता घेतली जाते. आगामी काळ भाजपसाठी भरभराटीचा राहणार आहे.
केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह हे दि. २८ रोजी महाराष्ट्र दौर्यावर येणार आहेत, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस नीरा-भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, तालुकाध्यक्ष अॅड. शरद जामदार, शहराध्यक्ष शकील सय्यद, विलासराव वाघमोडे, बाबामहाराज खारतोडे, युवराज मस्के, अशोक शिंदे, भाजप मागासवर्गीय सेलचे प्रदेश सरचिटणीस सचिन आरडे उपस्थित होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सध्याच्या वीज भारनियमनामुळे शेतकरी व नागरिक त्रस्त आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकारकडून भारनियमन कमी करण्याचा प्रयत्न केला जात नाही, अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली.