ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्ररणधुमाळी

महावितरणच्या अघोषीत भारनियमनच्या विरोधात भाजपचे धरणे आंदोलन

वालचंदनगर : गणेशोत्सवाच्या आधीपासून आणि गणेशोत्सव सुरू झाल्यापासून दररोज दिवसातून तीन ते चारवेळा वीज घालवून वालचंदनगर, कळंब, जंक्शन, लासुर्णे या इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये महावितरणने अघोषित भारनियमन सुरू केल्यामुळे घरगुती ग्राहक, लघु उद्योजक, छोटे मोठे व्यावसायिक यांच्यामध्ये महावितरणच्या कारभाराबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. महावितरणकडून विजेचा हा जो लपंडाव सुरू आहे तो त्वरित बंद न झाल्यास महावितरणच्या जंक्शन कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले जाईल असा इशारा भारतीय जनता पक्षातर्फे देण्यात आला आहे.

श्री गणेशोत्सवापूर्वी महावितरणचे अशा पद्धतीचे भारनियमन सुरूच होते. परंतु गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर महावितरणच्या वीज पुरवठय़ामध्ये काही सुधारणा होईल अशी जनतेची अपेक्षा होती. परंतु, ऐन गणेशोत्सवात सुद्धा दिवसातून तीन ते चारवेळा वीजपुरवठा खंडित करून चार ते पाच तासांचे अघोषित भारनियमन महावितरणने सुरूच ठेवले आहे.

शेतीसाठी वापरले जाणारे विद्युतपंप सोडून छोटे मोठे व्यावसायिक, लघुउद्योजक, घरगुती वीज वापरणारे ग्राहक हे घटक दरमहाच्या वीजबिलाचा भरणा अत्यंत प्रामाणिकपणे करतात. हे प्रमाण नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे. त्यांनी वीजबिल भरणा केला नाही तर वीज वितरणचे कर्मचारी मुदत संपताच वीजजोडणी तोडून टाकतात. त्यामुळे असे ग्राहक आपल्या वीजबिलाचा भरणा मुदतीच्या आत करतात परंतु महावितरण त्यांना योग्य न्याय देण्याऐवजी त्यांच्या डोक्यावर अघोषित भारनियमन लादून घोर अन्याय करीत आहे. या अन्यायाचा भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड. शरद जामदार यांनी तीव्र निषेध केला आहे.

महावितरण तसेच पुणे जिल्ह्यातील प्रशासनात बसलेले अधिकारी, कर्मचारी अजूनही महाविकास आघाडी सरकारच्याच मानसिकतेमध्ये आहेत. त्यांना कर्तव्यदक्ष जनताभिमुख काम करणारे शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्रात राज्यावर आले आहे याची योग्य पध्दतीने जाणीव करून द्यावी लागेल असेही अॅडव्होकेट जामदार यांनी सांगितले. वीजपुरवठय़ामध्ये त्वरित सुधारणा न झाल्यास महावितरणच्या जंक्शन येथील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले जाईल व अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल असा इशाराही अॅडव्होकेट जामदार यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये