ताज्या बातम्यादेश - विदेश

उत्तर प्रदेश निवडणूक २०२७; भाजप बनवणार पाच लाख पदाधिकारी

उत्तर प्रदेश भाजपने २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ४.८६ लाख कार्यकर्त्यांना ‌‘पदाधिकारी‌’ बनवले जाणार आहे. भाजप ‌‘व्हॉट्सॲप प्रमुख‌’, ‌‘लाभार्थी प्रमुख‌’ आणि ‌‘मन की बात प्रमुख‌’ या पदांवर नियुक्ती करणार आहे. अधिकाधिक कार्यकर्त्यांना पद देणे, मतदान केंद्र व ‘सोशल मीडिया’वर पकड मिळवणे हा त्याचा उद्देश आहे.

भाजपचे सरचिटणीस धरमपाल सिंह म्हणाले, की आम्ही अडीच कोटी सदस्य जोडले आहेत. आता बूथ समित्या स्थापन केल्या जात आहेत. प्रत्येक बूथवर अध्यक्षांसह ११ सदस्य असतील. त्यामध्ये प्रत्येकी एक सचिव, व्हॉट्सॲप प्रमुख, ‘मन की बात’ कार्यक्रम प्रमुख आणि लाभार्थी प्रमुख असतील. ५ डिसेंबरपर्यंत बूथ समित्या, १५ डिसेंबरपर्यंत विभाग अध्यक्षांची निवड होईल. उत्तर प्रदेशात सध्या १,६२,०१२ मतदान केंद्रे आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्रसिंह चौधरी म्हणाले, की घटनेतील आरक्षणाच्या तरतुदीनुसार संघटनाही स्थापन होईल.

या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात ३.६२ कोटी (४१.४ टक्के) मते मिळाली, तर २०१९ मध्ये पक्षाला ४.२८ कोटी मते (५० टक्के) मिळाली. ८.५ टक्के मतांची ही उणीव भरून काढण्यासाठी पक्ष संघटनेची नवी रचना करत आहे. यामध्ये तरुण, मागासवर्गीय, दलित, महिला यांना महत्त्व देण्याची तयारी सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये