‘भाजपनं राज ठाकरेंचा वापर राजकारणासाठी केला…’; संजय राऊतांची टीका
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंचा वापर राजकारणासाठीच केला अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तर मनसेचे भोंगे मनसेवरच उलटणार असा इशाराही राऊतांनी यावेळी दिला आहे. संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
राज ठाकरेंचा वापर राजकरणासाठी केला गेला आहे. त्यांचे भोंगे त्यांच्यावरच उलटत आहेत निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. भाजपनं पुन्हा एक राज ठाकरेंचा बळी दिला आहे, असं संजय राऊत म्हणाले. तर राज ठाकरेंचा हा विषय सामाजिक नाही हा धार्मिकच असल्याचं देखील ते म्हणाले.
राज ठाकरेंच्या या निर्णयानं हिंदू नाराज झाले आहेत हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं काम सुरु झालं आहे, हिंदूमध्ये संताप आहे पण हिंदूनी आता संयम बाळगला पाहिजे असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.
पुढे संजय राऊत म्हणाले, राज ठाकरेंविरोधात सीएमओ कार्यालयात तक्रारी आल्या आहेत. हिंदूसाठी आणि श्रद्धाळूसाठी आजचा दिवस काळा मानला जातो. आज सकाळपासून महाराष्ट्रातील तिर्थस्थानांवरची काकड आरती बंद झाली आहे. शिर्डी, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या आरत्या बंद झाल्या आहेत. भोंग्यांच्या निमित्ताने सर्व मंदिरांवरचे भोंगे बंद झाले आहेत.