रस्त्याकडेला झोपलेल्या मजुरांना भरधाव ट्रकने चिरडले; चार जणांचा जागीच मृत्यू
बुलढाणा | Buldhana Accident – बुलढाण्यातील (Buldhana) खामगाव-मलाकापूर दरम्यान वडनेर गावाजवळ भीषण अपघात (Accident) झाला आहे. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या दहा मजुरांना एका भरधाव ट्रकनं चिरडलं. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला असून 6 मजूर गंभीर जखमी आहेत. सध्या जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
वडनेर येथे काही मजूर महामार्गाच्या कामासाठी आले होते. त्यामुळे रस्त्याच्या कडेलाच त्यांची झोपडी होती. तर रात्री हे मजूर गाढ झोपेत असताना एक भरधाव ट्रक त्यांच्या झोपडीत घुसला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा ट्रक झोपडीत घुसला आणि तेथील 10 मजुरांना चिरडलं. या अपघातात चार मजूरांचा जागीच मृत्यू झाला असून सहाजण गंभीर जखमी आहेत. तर या सहा जखमींपैकी दोघांची परिस्थिती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय.
या अपघातात निधन झालेले मजूर हे चिखलदऱ्याहून रस्त्याच्या कामासाठी आले होते. तर अभिषेक रमेश जांभेकर (18), प्रकाश बाबू जांभेकर (26) आणि पंकज तुळशीराम जांभेकर (26) अशी अपघातात मृत पावलेल्या मजुरांची नावं आहेत. तसंच चौथ्या मजुराचं अद्याप नाव समजू शकलेलं नाहीये. दरम्यान, या अपघाताची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.