‘…पण त्या इतकं अवघड काम दुसरं नाहीये’; शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

औरंगाबाद : आज (बुधवार) औरंगाबाद शहरातील एमजीएम कॅम्पस येथील रुक्मिणी भवन सभागृहामध्ये एक आगळावेगळा कार्यक्रम पार पडला. शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून विभागातील आठ जिल्ह्यातील ३३०० शाळांना दहा कोटी ३१ लाख २५ हजार रुपये किंमतीची ११ लाख ७१ हजार ५०० पुस्तके ग्रंथालयांसाठी भेट देण्याच्या कार्यक्रमाला आज शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या दोघांच्या हस्ते एमजीएम विद्यापीठातील रुक्मिणी सभागृहात हा मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये भाषण देताना शरद पवार यांनी ते शिक्षणमंत्री असतानाच एक किस्सा आवर्जून सांगितला आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांनी हा किस्सा सांगताना अगदी हात जोडल्याचं पहायला मिळालं आहे.
यावेळी शरद पवार म्हणाले, “विक्रम काळेंनी मला फोन करुन सांगितलं की आम्हाला १५ मिनिटं द्या. आम्हाला जी पुस्तकं वाटायची आहेत त्या कार्यक्रमाची सुरुवात करुन फक्त जा. मी घड्याळ बघतोय. विक्रम काळे हे शिक्षकांचे प्रतिनिधीचं गणित इतकं कच्चं असेल याचं उदाहरण आता पाहायला मिळालं. १५ मिनिटं झाली आणि आपण जवळपास एक तासावर आलाय,” असं पवारांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
“वेगवेगळ्या क्षेत्रातील विचारवंताची पुस्तकं आहेत. यातून वाचन संस्कृती वाढवी हे डोक्यात ठेऊन विधीमंडळाच्या सदस्याचा जो काही निधी असतो. त्याचा योग्य वापर करण्याचा आदर्श कार्यक्रम विक्रम काळेंनी हाती घेतला. तसंच त्याची आता सुरुवात होतेय खासदाराला जे काही मिळतं आणि आमदाराची तुलना केली तर महाराष्ट्रातील लोकप्रितिनिधांना लोकांसाठी काम करता यावं म्हणून अर्थमंत्र्यांकडून एवढी मोठी रक्कम राज्यातील लोकप्रितिनिधींना दिली जाते आहे,” असंही पवार म्हणाले.
पुढे शरद पवार म्हणाले, “पुस्तक एवढ्या मोठ्या प्रमाणात वाटप करणं सोप्पी गोष्ट नाही. आजच्या कार्यक्रमात येण्यापूर्वी काळजी वाटत होती,” असं म्हणत शरद पवारांनी ते शिक्षणमंत्री असतानाच किस्सा सांगितला. “मी एकदा शिक्षण मंत्री होतो. शिक्षणमंत्री म्हणून काही वर्ष महाराष्ट्रात काम केलं. पण त्या इतकं अवघड काम दुसरं नाहीय. त्याचं कारण शिक्षकांच्या संघटना आणि त्यांचे नेते मिळून शिक्षण मंत्र्यांना सांगत असतात, हे हे करा, त्या त्या पद्धतीनं करा, हा निर्णय असा घ्या, तो निर्णय तसा घ्या. त्यानंतर मी विचार केला की हा निर्णय जर घेतला तर राज्यातील एकंदर शिक्षक किती, शिक्षण क्षेत्रातील सहभागी किती, आर्थिक बाजू किती बरी आहे. हे सर्व पाहता एवढा बोजा माझ्या खात्याच्या बजेटमध्ये शक्य नाही हे ध्यानात आल्यानंतर शिक्षक संघटनेचे नेते प्रश्न मांडत असतात पण मंत्र्याला त्यावर हो की नाही बोलताना येत नाही.”
तसंच शरद पवार यांनी पुढे बोलताना अगदी हात जोडून खातं बदलून घेण्याचा किस्सा सांगितला. “मंत्री हो की नाही बोलत नाही बघितल्यावर शिक्षक संघटनेच्या लोकांना वाटतं की हा मंत्री आपल्या वर्गातला कच्चा विद्यार्थी आहे त्याला अजून त्याला समजलेलं नाही समजून पुन्हा पुन्हा ते समजून सांगण्याचं काम त्या संघटनेचे लोक करत असतात,” असं पवार म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी, “त्यामुळे महाराष्ट्राचं मंत्रीमंडळ बदललं वसंतराव नाईक गेले. शंकरराव चव्हाण आले. शंकरराव चव्हाणांना मी सांगितलं की तुम्ही मला (मंत्रीमंडळामध्ये) घेणार असाल तर मला शिक्षण खात्यातनं काढा आणि मला शेती खातं किंवा असं काहीतरी द्या. त्यांनी मला शेती खातं दिलं आणि माझ्या दृष्टीनं माझी सुटका केलेली.”