दुसरं विचाराना ते नका विचारु, व्हायरल व्हिडिओवर बोलू शकत नाही, गौतमी पाटील भावूक
नाशिक : नाशिक जिल्ह्यात प्रथमच प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. नाशिकच्या निफाड तालुक्यात लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे बॅनर्स देखील निफाड शहरात लागले होते. गौतमी पाटीलच्या या कार्यक्रमाला चाहत्यांनी अक्षरशः तिकीट खरेदी करत लावणी महोत्सवाला गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. नाशिकच्या निफाड मध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान गौतमी पाटीलने माध्यमांशी संवाद साधला आहे. पुण्यातील कार्यक्रमात जो प्रकार घडला त्यावर गौतमी पाटीलनं प्रतिक्रिया दिली आहे. त्याबाबतीत कायदेशीर कारवाई सुरु आहे. मी त्याबाबतीत काही बोलू शकत नाही, असं गौतमी पाटील म्हणाली.
गौतमी पाटीलच्या निफाडमध्ये झालेल्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी पेड पास ठेवण्यात आले होते. तरी देखील मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी पास खरेदी करत गर्दी केली होती.
गौतमी पाटीलचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात झालेल्या किरकोळ वादामुळे देखील गौतमीचा कार्यक्रम वादात सापडला होता. त्या व्हायरल व्हिडिओ वर प्रतिक्रिया देण्यास गौतमीनं नकार दिला आहे. यावेळी आपल्या कार्यक्रमात अनेक तरुणांकडून हुल्लडबाजी केली जाते, त्यांना काय आवाहन कराल असा पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर मला त्या प्रकरणावर काहीही बोलायचं नाही, असं गौतमी पाटील म्हणाली.