ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

जयंत पाटलांच्या घरावर भाजपचा झेंडा? भाजप नेत्याच्या वक्तव्याने राष्ट्रवादीत खळबळ!

सांगली : (Gopichand Padalkar On Jayant Patil) चार महिन्यापुर्वी केलेल्या एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनं शिवसेना पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरेंना खाली खेचत एकनाथ शिंदेंनी-भाजपबरोबर जात सत्ता स्थापन केली. शिवसेनेत फूट पाडण्यास भाजपच कारणीभूत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येतो.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असतानाच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, “भाजपचा झेंडा आज राष्ट्रवादीच्या कार्यालयावर लागला आहे. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, हाच भाजपचा झेंडा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर दिसेल. त्यानंतर मुंबईच्या राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात नेमका झेंडा कोणाचा लागणार, यामुळे त्यांच्यात वाद होईल. त्यात बहुमताने कार्यकर्ते म्हणतील आता भाजपत प्रवेश करूया,” असं वक्तव्य गोपीचंद पडळकर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दोन दिवसांपुर्वीच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर भाजपचं पुढील लक्ष राष्ट्रवादी असल्याचं सांगितलं होतं. “शिवसेना एक मोठा पक्ष होता. त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणून, राजकारण करून तो पक्ष फोडण्यात आला. पण, दुसरं लक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असू शकतो हे मी बोललो होतो. कारण, शिवसेनेनंतर दुसरा मोठा पक्ष राष्ट्रवादी आहे,” असा दावा रोहित पवारांनी केला होता. त्यामुळे आता राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये