ताज्या बातम्यारणधुमाळी

माजी महापौर किशोरी पेडणेकर पालिका आयुक्तांवर नाराज; पत्र लिहून केली ‘ही’ मागणी

मुंबई : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) मुंबई महापालिका आयुक्तांवर नाराज आहेत. तसेच किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई महापालिका प्रशासनाकडून नगरसेवकांकडून घेण्यात आलेले निर्णय बदलण्यात येत असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेची मुदत संपल्याने सध्या महापालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल (iqbal chahal) हे सध्या प्रशासक म्हणून काम करत आहेत. मुंबई महापालिकेच्या कार्यकाळात अनेक निर्णय घेण्यात आले होते. मुंबई महापालिकेची मुदत संपण्याआधी घेतलेल्या निर्णयात प्रशासनाचा हस्तक्षेप सुरू असल्याची चर्चा आहे. पालिका सभागृह आणि स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयात प्रशासन बदल करत आहेत. हा बदल म्हणजे सभागृहाचा अवमान असल्याचं माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. तसंच विरोधकांच्या दबावाला बळी पडू नका असं आवाहनही त्यांनी पालिका प्रशासनाला केलं आहे.

किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे की, महानगरपालिकेच्या कार्यकाळात महानगरपालिका तसेच स्थायी समितीसह विविध समित्यांनी घेतलेल्या निर्णयामध्ये फेरफार करण्याबाबतचे प्रस्ताव संबंधित खात्यांकडून प्रशासकाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येत असल्याची माहिती आहे. मात्र, महानगरपालिका तसेच स्थायी समितीसह विविध समित्यांनी महानगरपालिकेच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांमध्ये कोणताही फेरफार अथवा सदर प्रस्ताव रद्द करण्याबाबतचे निर्णय महानगरपालिका अस्तित्वात येईपर्यंत प्रशासकांनी घेणे योग्य ठरणार नसल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये