उपक्रमशील शिक्षक – सांस्कृतिक वारसा जपणारे कलाशिक्षक : अशोक साबळे

ज्ञानमंदिर |
विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक मूल्ये रुजल्यामुळे होत असतो. शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, चित्रकला स्पर्धा, नृत्य, नाट्य, वाचन संस्कृती, राष्ट्रीय सण, लोकशाही रुजण्यासाठी विद्यार्थ्यांना मतदान पद्धतीने अनुभूती असे उपक्रम राबवून सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम कलाशिक्षक अशोक नंदराज साबळे करीत आहेत.
महाराष्ट्र हा डोंगर, दर्याखोर्यांनी नटलेला प्रदेश आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील भीमाशंकरच्या निसर्गरम्य असणार्या राजेवाडी येथील आदिवासी भागात खडतर परिस्थितीत शिक्षण घेऊन कला विषयाची आवड असल्याने आर्ट मास्टरची पदवी घेऊन अशोक साबळे यांनी आपल्या कलेचा श्रीगणेशा कोथळे येथील विद्या महामंडळ प्रशालेतून केला. विद्यार्थ्यांमध्ये कला विषयाची गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळेत शासकीय ग्रेड चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. या परीक्षांचा दरवर्षी शंभर टक्के निकालाबरोबरच उच्च श्रेणीत मुले उत्तीर्ण होऊन विद्यार्थ्यांतील कलेच्या गुणांना वाव मिळाला. केवळ शाळेपुरते न थांबता पुरंदर तालुका कला शिक्षक संघाच्या अध्यक्ष तसेच जिल्हा संघाच्या उपाध्यक्षपदावर कार्यरत असताना, कलाशिक्षकांसाठी कार्य शाळा, तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा, कलाशिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्याची प्रथा सुरू केली.
बालकुमार चित्रकला स्पर्धा, जिल्हा पातळीवरील नृत्य व नाट्य स्पर्धा, चित्रकला प्रदर्शन, वाचन संस्कृती वाढण्यासाठी ग्रंथ दिंंडी, गणेशोत्सव, नवरात्र, शिवजयंती, राष्ट्रीय सण, आदी उपक्रमात कलेची आवड असणार्या विद्यार्थ्यांना सहभागी करून देशाचा सांस्कृतिक वारसा त्यांच्यात रुजविण्याचे काम अशोक साबळे करीत आहेत. जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेत सलग तीन वेळा उत्कृष्ट दिग्दर्शक व जिल्हा व तालुका स्तरावर अनेक पुरस्कारांनी अशोक साबळे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
चित्रकला, संगीत, नाट्य क्षेत्रात मुलांनी प्रावीण्य मिळवावे यासाठी लोकसहभागातून कलेचे शैक्षणिक साहित्य मिळवून देण्यास त्यांचा पुढाकार असतो. भारताची लोकशाही ही जगातील मोठी लोकशाही असून, या लोकशाहीची मूल्ये विद्यार्थ्यांत रुजावी यासाठी शाळेत वर्गप्रतिनिधींच्या निवडणुका इव्हीएम मशीन द्वा घेऊन मतदानाविषयी अनुभूती देण्याचे काम अशोक साबळे करीत आहेत. शाळेचा व्हरांडा बोलका करण्यासाठी वारली पेंटिंग, प्रजासत्ताकदिन व स्वातंत्र्यदिनी मैदानावर फुलांची व रांगोळीची आकर्षक सजावट करणा कलाशिक्षक अशोक साबळे हे विद्यार्थीप्रिय शिक्षक ठरले आहेत.