“तो हिरवा साप आता…”, चंद्रकांत खैरेंचं अब्दुल सत्तारांवर टीकास्त्र
मुंबई | Chandrakant Khaire On Abdul Sattar – ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) गुरूवारी ओला दुष्काळ पाहण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख ‘छोटा पप्पू’ असा केला. यासंदर्भात विचारलं असता चंद्रकांत खैरेंनी (Chandrakant Khaire) संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी अब्दुल सत्तारांचा (Abdul Sattar) एकेरी उल्लेख करत चंद्रकांत खैरे म्हणाले, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शपथ घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत अब्दुल सत्तारांना गाढण्याचं काम मी करणार आहे. काहीही केलं तरी त्याला निवडून येऊ देणार नाही. त्यानं अनेकांना लुबाडलं आहे. अनेक मुस्लिमांच्या जमिनीही त्यानं हडपल्या आहेत. याबाबतची कागदपत्रं माझ्याकडे आली आहेत. त्यामुळे त्यांना देवेंद्र फडणवीस कसं सहन करतात? असा माझा प्रश्न आहे. अब्दुल सत्तारांचा बेशिस्तपणा तुम्हाला आवडतो का? मंत्रिमंडळात सत्तारांसारखे मंत्री असल्यानं तुमच्या सरकारचं नाव बदनाम होत आहे. त्यामुळे अशा मंत्र्यांना तोबडतोब काडून टाकलं पाहिजे, अशी मागणी मी फडणवीसांकडे करतो, असं खैरे यांनी म्हटलं आहे.
“देवेंद्र फडणवीस, तुम्हाला माहीत आहे की, अब्दुल सत्तार सुरुवातीला भाजपमध्ये आले होते. पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी मेळावा घेऊन सत्तारांना विरोध केला. त्यामुळे तुम्ही सत्तारांना आमच्याकडे ढकललं. युती असल्यानं उद्धव ठाकरेंनी सत्तारांना शिवसेनेत सामावून घेतलं आणि निवडूनही आणलं”, असंही चंद्रकांत खैरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, आता इतकं झाल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते मला आठवण करून देतात की, तुम्ही सत्तारांना हिरवा साप म्हणायचे. आता मी सिल्लोडला जाऊन भाषण करणार आहे, त्यातही मी त्यांना हिरवा सापच म्हणणार आहे. माझे मुस्लीम भाऊही हे ऐकतील, तेही माझं समर्थन करतात. कारण अब्दुल सत्तारांनी मुस्लिमांच्या जमिनी हडपल्या आहेत. तो हिरवा साप अलीकडे भगवा झाला होता. पण आता तो सरडा झाला आहे, अशी खोचक टीकाही खैरेंनी सत्तारांवर केली आहे.