मनसे-भाजप युतीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, “युतीचा प्रस्ताव आल्यास भाजप…”

कोल्हापूर : मनसेच्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र होते. तेव्हापासून आगामी महापालिका निवडणुकींत भाजप, शिंदे गट आणि मनसे एकत्र येतील अशी चर्चा आहे. दरम्यान, अंधेरी पूर्व निवडणुकीसाठी देखील राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आपला उमेदवार मागे घेण्याची विनंती करणारे पत्र पाठवले होते. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या विनंतीला मान देत आपला उमेदवार मागे घेतला होता. त्यावरून मनसे आणि भाजप यांच्यातील जवळीक दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे.
आज सकाळी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. मात्र, ही भेट राजकीय नसून दिवाळीच्या सुभेच्छा देण्यासाठी भेट झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, भाजप-मनसे युतीच्या चर्चांवर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
कोल्हापुरात बोलत असतान चंद्रकांत पाटील यांना भाजप – मनसेच्या युतीबद्दल विचारले असता त्यांनी म्हटले की, “मनसेबरोबर युतीचा प्रस्ताव अजून आला नाही. प्रस्ताव आल्यास महाराष्ट्राची भाजपची १३ जणांची कोअर कमिटी आहे, ती त्यावर निर्णय घेईल. मात्र, याबाबत अजून आमची कोणतीही बैठक झालेली नाही. त्यामुळे युतीवर अजून काही सांगू शकत नाही.” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.