“मातोश्रीमध्ये राहुन…”, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरून चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

पुणे | Chandrakant Patil On Aditya Thackeray – राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे. या दरम्यान, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टीका केली आहे.
“महात्मा गांधींसारखे नेते निर्माण झाले याचं कारण की ते देश फिरले, सर्वसामान्य माणसांचं मन समजून घेतलं, हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना उशिरा कळलं. यांना बराच काळ असं वाटलं की मातोश्रीमध्ये राहुनच माणसांची दु:ख कळतात. मात्र, आता त्यांना साक्षात्कार झाला आहे”, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.
प्रत्यक्ष मैदानात उतरल्यावर मागण्या करताना आपण सत्तेत असताना या गोष्टी केल्या नाहीत, याची आठवण ठेवावी, असा सल्लाही चंद्रकांत पाटलांनी ठाकरे पिता-पुत्रांना दिला आहे. तसंच आदित्य ठाकरेंनी नुकताच नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला आहे. प्रशासनाला तातडीने मदत करायला लावू, असं आश्वासन ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे.
दरम्यान, “गद्दारांनी खोके त्यांच्याजवळ ठेवले, मदतीला दिले नाहीत. पण आम्हाला राजकारण करायचं नाही. ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि याबाबतचा आवाज आम्ही विधानसभेत उठवू”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.