
पुणे: गुडीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील भाषणात राज ठाकरे यांनी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर झोडून टिका केली होती. त्यावर मनसे ही भाजपची ‘बी’ टीम असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आली. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चांना उधाण आलेलं आहे. मनसे भाजपशी युती करेल कि काय असच सर्वांना वाटत आहे. मात्र यावर याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट उत्तर दिलंय.
चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी यावर थेट भूमिका आज स्पष्ट केली. ते म्हणाले अशा युतीच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी आमची १३ जणांची टीम आहे. मात्र, आम्ही निर्णय घेऊ शकत नाही, ते गुरुवारी (१४ एप्रिल) पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आले असताना माध्यमांशी बोलत होते.
युतीसंदर्भात चंद्रकांत पाटील म्हणाले, “मनसेसोबत युती करण्याचा अजून कुठलाही प्रस्ताव नाही. प्रस्ताव आल्यानंतर त्यावर विचार करण्यासाठी आमची राज्याची १३ जणांची कोअर कमिटी आहे. ते देखील निर्णय करू शकत नाहीत. ते जास्तीत जास्त केंद्राकडे प्रस्ताव पाठवतील. त्यामुळे तसा कोणताही निर्णय आत्ता नाही.”
राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वावर ते बोलत होते. ते म्हणाले, राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते कुणाची बी टीम म्हणून काम करत नाहीत. कुणाच्या सांगण्यावरून ते बोलत नाहीत. त्यांना जी मत मांडायची ती ते परखडपणे मांडतात. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप विरोधात देखील मतं मांडलेली आहेत. असंही ते म्हणाले.