भारताच्या कुशीत चंद्र

बोधकथांपासून ते विरह गीतांपर्यंत चंद्राला एका काल्पनिकतेची उपमा देण्याच्या पर्वाला आज पूर्णविराम मिळाला. खऱ्या अर्थाने चंद्र भारताच्या कुशीमध्ये विराजमान झाला. चंद्र आपला झाला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदा भारताने पाऊल ठेवले आणि इतिहासाच्या आणि भूगोलाच्या साऱ्या संकल्पना, परिभाषा आज बदलून गेल्या. प्रचंड ऐतिहासिक विजय आणि एका क्रांतिकारी युगाचे साक्षीदार म्हणून ही पिढी या क्षणाला अनुभवते आहे.
दक्षिण ध्रुवाचा उंबरठा हा भल्याभल्यांना लांबचा वाटला. अनेकांनी अपयशाचे तोंड पाहिले. आंतरराष्ट्रीय समुदायासोबत भारतानेदेखील काही मोहिमांमध्ये अपयशाचे तोंड पाहिले, परंतु अखेर तिरंगा चंद्रावर फडकवलाच. जगाच्या इतिहासाला बदल देणारा आणि जगाला एक नवा संदेश देणारा हा क्षण आज तमाम भारतीय अनुभवत आहेत. चंद्र मोहीम यशस्वी झाली.
चांद्रयान-३ चंद्रावर विराजमान झाले. १४० कोटी भारतीयांचे स्वप्न आज प्रत्यक्षात साकार झाले आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतून याबद्दल आनंद व्यक्त केला. उपमुख्यमंत्र्यांनी जपानमधून, भारतीय नागरिकांनी इंग्लंडच्या टाइम स्क्वेअरमधून, तर दुबईस्थित भारतीयांनी बुर्ज खलिफासमोर स्क्रीन उभारून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रेशन केले. चांद्रयान मोहीम ही भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची होती.
चंद्राचे गुरुत्वाकर्षण आणि तेथील टायमिंगने नेहमीच अनेकांना दगा दिला, परंतु आज तंतोतंत तांत्रिक कसरती करीत इस्रोने ही महाकठीण मोहीम साध्य केली. यापुढे सूर्यमालेचा अभ्यास करण्यासंदर्भात या चांद्रयानाचा मोठा उपयोग होणार आहे. इतिहास आणि भूगोल बदलण्याची क्षमता असलेल्या ह्या चांद्रयानाचे पहिले पाऊल ह्या भारताच्या शास्त्रीय आणि वैज्ञानिक सक्षमतेला नवी उंची प्राप्त करून देणार आहे. सूर्यमालेवर असणारे वातावरण पृथ्वीवरचे अनेक रहस्य यामुळे उलगडतील.
सॉफ्ट लँडिंगनंतर तेथील येणारी छायाचित्रे वातावरणाचा अभ्यास, वातावरणाचे बदल, वारे आणि मुख्य म्हणजे तेथील ऑक्सिजनच्या संदर्भामध्ये अपेक्षित असलेले शोध मोठ्या प्रमाणामध्ये घेण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांना आता यश मिळणार आहे. सिलिकॉनसारखे पदार्थ, लोहसारखे पदार्थ, तेथील बर्फ आणि पाणी यांचे अंश तपासण्याबद्दलचा अभ्यास जो अनेक वर्षे अनेक देशांकरिता एक अशक्यप्राय गोष्ट होती ती या चांद्रयान मोहिमेने सोपी होणार आहे.
जर चंद्रावर बर्फ आणि पाण्याचे अंश सापडले तर ऑक्सिजनची निर्मिती करणे शक्य होणार आहे. त्यामुळे चंद्रावर मानवी वस्तीचे एक अगम्य दुर्लभ स्वप्नदेखील पूर्ण होण्याकडे एक दमदार पाऊल पडणार आहे.अनेक अर्थाने ही मोहीम प्रचंड यशस्वी आणि अत्यंत अपेक्षा वाढवणारी आहे. आज दूरचित्रवाहिनीवर पाहताना चांद्रयान-३ उतरले व सर्व शास्त्रज्ञांनी टाळ्या वाजवल्या. पंतप्रधानांनी तिरंगा फडकावला, त्यावेळी कोट्यवधी भारतीयांचा ऊर भरून आला. डोळ्यांमध्ये आनंदाश्रू येऊन आनंदाने सारे जग थिटे वाटावे, असा हा अभिमानास्पद क्षण भारतीयांनी अनुभवला. यापुढच्या मोहिमांना आणि इस्रोच्या कामगिरीला शुभेच्छा देत असताना आज देशवासीयांनी भारतीय शास्त्रज्ञांना मनापासून कडक सॅल्यूट केला आहे.