चिंचवडचा गड भाजपने राखला, राष्ट्रवादीला बंडाचा फटका; अश्विनी जगताप यांचा मोठा विजय

चिंचवड : (Chinchwad By-election Results 2023) पुणे पोटनिवडणुकीची (Pune By-Poll Election) घोषणा झाल्यापासून चर्चेत होती. महाराष्ट्रात उद्भवलेल्या सत्तासंघर्षाचे परिणाम पुणे पोटनिवडणुकीवरही पाहायला मिळाले. अखेर चिंचवड मतदारसंघात (Chinchwad Assembly Constituency) भाजपचीच (BJP) सरशी झाली आहे. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी 36 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत तिहेरी लढत पाहायला मिळाली होती. अश्विनी जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नाना काटे (Nana kate) आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांचं आव्हान होतं. महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) या निवडणुकीत कलाटेंच्या बंडखोरीचा फटका बसल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच अश्विनी जगताप यांनी आघाडी मिळवण्यास सुरुवात केली होती. तिरंगी लढतीचा फायदा अश्विनी जगताप यांना झाल्याचे दिसून आले. मतमोजणीच्या 37 व्या फेरीनंतर अश्विनी जगताप यांना 1 लाख 35 हजार 603 मते मिळाली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना 99 हजार 435 मते मिळाली. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 44 हजार 112 मते मिळाली. अश्विनी जगताप या 36 हजार 168 मतांच्या फरकाने विजयी झाल्यात.
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर चिंचवड मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा खूप प्रयत्न झाला. पण अखेर महाविकास आघाडीने निवडणूक बिनविरोध न करता आपला उमेदवार घोषित केला. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली. पण उमेदवारीसाठी आग्रही असलेले राहुल कलाटे यांची नाराजी महाविकास आघाडीने ओढवून घेतली. अखेर भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादीकडून नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पण नाराज झालेल्या राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या होत्या.