“उर्फीला माझा विरोध नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या…”, चित्रा वाघ यांनी व्यक्त केली खंत
मुंबई | Chitra Wagh – भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी अभिनेत्री, माॅडेल उर्फी जावेदवर (Urfi Javed) हल्लाबोल केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रामध्ये हा नंगानाच चालू देणार नाही, असा इशारा चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला दिला आहे. त्यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या की, “भरदिवसा एक बाई रस्त्यावर उघडी फिरते, नगण्य कपडे घालून अंगप्रदर्शन करते हे किती योग्य आहे? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. मुंबईच्या रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी उर्फी नावाची एक महिला नंगानाच करत आहे. मला एक महिला सतत मेसेज करत होती की मला बोलायचं आहे. एक दिवस त्या महिलेनं मला एक व्हिडिओ पाठवला. एक मुलगी सार्वजनिक ठिकाणी अंगावर नगण्य कपडे घालून आपल्या शरीराचं प्रदर्शन करताना दिसली. मला ज्या महिलेनं व्हिडिओ पाठवला तिच्याशी मी बोलले तेव्हा त्या म्हणाल्या माझी मुलगी याला बळी पडली आहे. त्यामुळेच मी ही भूमिका घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात असा नंगानाच मी चालू देणार नाही”, असा इशारा यावेळी चित्रा वाघ यांनी उर्फीला दिला.
“उर्फीला माझा विरोध नाही पण तिच्या नंगानाच वृत्तीचा आहे. अरे आधी कपडे तर घाला मग ठरवा कुणी काय घालायचं. समाज ज्या ठिकाणी महत्वाचा असतो त्याठिकाणी राजकारण करू नये. पण दुर्दैवानं आपल्या राज्यात तसं झालं नाही. जो नंगानाच सुरू आहे तो आपल्या महाराष्ट्राला शोभनीय नाही. राज्यात असला नंगानाच चालू देणार नाही”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
“उर्फीला महिला आयोगानं सॉफ्ट कॉर्नर दिला आहे. मुंबईत एक महिला सार्वजनिक ठिकाणी उघडीनागडी फिरत असताना या प्रकरणाची महिला आयोगानं दखल घेतली नाही, हे दुर्दैवी आहे. समाजमाध्यमात अश्लील, घाणेरडे, ओंगळवाणे व्हिडीओ व्हायरल होत असताना देखील दुर्लक्ष केलं गेलं”, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.
2 Comments