“भाजप अजूनही टी-शर्ट आणि खाकी चड्डीतच अडकले आहे”

रायपूर | CM Bhupesh Baghel On Bjp – केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसने कन्याकुमारी येथून बुधवार (7 सप्टेंबर) या पदयात्रेचा आरंभ केला आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यावेळी राहुल गांधींच्या हाती तिरंगा ध्वज सोपवला. तसंच आज (10 सप्टेंबर) काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा तिसरा दिवस आहे. याच दरम्यान राहुल गांधी यांच्या टी-शर्टवरून वाद सुरू झाला आहे. ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान शुक्रवारी महागाईचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधींनी 41,257 रुपयांचा टी-शर्ट घातला होता, असा दावा करत भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मात्र या टीकेला काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. काँग्रेसचे नेतेदेखील पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत आहेत.
याच संदर्भात आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. “काँग्रेस देशाला जोडण्यात गुंतलेली आहे. तर सत्ताधारी(भाजप) अजूनही टी-शर्ट आणि खाकी चड्डीतच अडकलेले आहेत”, असा खोचक टोला भूपेश बघेल यांनी भाजपला लगावला आहे.
“कीव करावीशी वाटत आहे. कन्याकुमारी ते काश्मीर, आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या भारत जोडो यात्रेला उत्तर, केंद्रातील सत्ताधारी पक्षाकडे ‘टी-शर्ट’ आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत जेव्हा एक पक्ष देशाला एकत्र आणत आहे, तेव्हा फूट पाडणारा पक्ष अजूनही टी-शर्ट आणि खाकी चड्डीत लटकलेला आहे. भीती चांगली वाटली.” अशा शब्दांमध्ये भूपेश बघेल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.