“भारत-पाकिस्तान सारखाच आम्हीही तीन महिन्यांपूर्वी सामना खेळलो आणि…”- एकनाथ शिंदे

मुंबई | Eknath Shinde – शिंदे गटाकडून ठाण्यात ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी शाब्दिक हल्लाबोल केला. “भारत-पाकिस्तान सारखाच आम्हीही तीन-साडेतीन महिन्यांपूर्वी एक सामना खेळलो आणि जिंकलो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, “दिवाळीबरोबरच काल भारतानं पाकिस्तानविरूद्ध जो सामना जिंकला, त्याचा आनंदही आपण आज साजरा करतो आहे. तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल तर, काल मेलबर्नच्या मैदानातही आपली ‘बाळासाहेबांची शिवसेना’ झळकली होती. कालचा सामना जसा जिंकला तसाच सामना आम्ही तीन-साडेतीन महिन्यांपूर्वी खेळलो आणि जिंकलोही. तो सामना महाराष्ट्रानं, देशानं बघितला. लोकांच्या मनातलं राज्य आणण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्ही सत्तेत येताच, आधी आपली परंपरा, संस्कृती, सण, उत्सव साजरे करण्याची परवानगी दिली.”
“खरं सांगायचं तर विकासाबरोबर या गोष्टीही आवश्यक आहेत. माणसाचं मन प्रसन्न असेल, तर त्याला पुढे जाता येतं. या राज्यात आता एक परिवर्तनाचं पर्व सुरू झालं आहे. आज मी ज्या ठिकाणी जातो, तिथे उत्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतो. या गोष्टींचं समाधान आणि आनंदही वाटतो. त्याचे परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीतही दिसून आले”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.