थेट व्हाट्सअॅपवरून मंत्र्यांपर्यंत पोहोचणार तक्रार, शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री मुंडे यांचे अनोखे पाऊल
मुंबई | Dhananjay Munde – बोगस बियाणे आणि कीटकनाशके विक्रेत्यांच्या विरोधामध्ये तक्रार करण्यासाठी आता शेतकऱ्यांना थेट व्हाट्सअॅपचा नंबर पुरविण्यात येणार आहे. या नंबरवरून शेतकरी थेट मंत्रालयामध्ये आपली तक्रार नोंदवू शकतो, असा क्रांतीकारी निर्णय कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी घेतला आहे. अशा स्वरूपाचा एक व्हाट्सअॅप क्रमांक तयार करून तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा असे निर्देश आज मुंडे यांनी दिले. यापूर्वी देशांमध्ये ओरिसा या राज्यांमध्ये अशा प्रकारची सुविधा होती, ही सुविधा आता महाराष्ट्रात देखील उपलब्ध होणार आहे.
कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठ्याबाबत त्यांनी मंत्रालयात कृषी विभागाचा तब्बल अडीच तास आढावा घेतला यावेळी श्री मुंडे बोलत होते. या बैठकीला अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, सहसचिव गणेश पाटील, संचालक विस्तार व सेवा विकास पाटील तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी सदर व्हट्सॲप क्रमांकावर तक्रार केल्यावर त्यांच्या नावाबाबत गोपनियता ठेवण्यात येईल. तसेच संबंधित जिल्ह्यातील भरारी पथकांना मेसेज जाऊन त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी तपासणी करण्याच्या सुचना श्री मुंडे यांनी यावेळी दिल्या.
शेतकऱ्यांना त्वरीत न्याय मिळण्यासाठी कडक कायद्याची गरज असुन त्याचे प्रारुप तयार करण्याचे निर्देश मंत्री मुंडे यांनी दिलेत. कापसाच्या एचटीबीटी या वाणाला केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने परवानगी दिली नाही. तरीही महाराष्ट्रात या बियाण्याची विक्री होत आहे. बियाणे उत्पादनाची परवानगी देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन परवाना प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात यावी असेही श्री मुंडे यांनी सांगितले.