महाराष्ट्रातल्या मदरशांमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक करा; भाजपची ठाकरे सरकारला विनंती
मंबई : नुकताच युपी सरकारने राज्यातील मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य केल्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर राष्ट्रगीत म्हटलं जातंय कि नाही याची देखील वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. युपी सरकारच्या याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्याही मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करा अशी मागणी भाजपकडून केली जात आहे.
भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी महाराष्ट्रातल्या मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्याची मागणी केली आहे. त्यांनी योगी सरकारच्या निर्णयाचे स्वागतही केले आहे. ते म्हणाले की, उत्तरप्रदेशातल्या सर्व मदरशांत राष्ट्रगीत बंधनकारक केलंय. धार्मिक शिक्षण, शारिरीक शिक्षणाबरोबर राष्ट्रभक्ती रुजणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही योगी सरकारच्या निर्णयाचं स्वागत करतो. तसंच महाराष्ट्र सरकारकडे मागणी करतो की त्यांनीसुद्धा असाच निर्णय घ्यावा आणि राज्याच्या सर्व मदरशांत राष्ट्रगीत बंधनकारक करावं”.