येरवडा मनोरुग्णालयातील स्थिती भयावह!

तीन वर्षांपासून प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित
समितीच्या शिफारशी केवळ कागदावरच
पुणे : आशिया खंडातील सर्वांत मोठे मनोरुग्णालय म्हणून येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाची ओळख आहे. येथे दररोज किमान नऊ ते दहा रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. या रुग्णालयात सुमारे २ हजार ५०० रुग्णांची क्षमता असून, १ हजार १३० रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु या रुग्णांची देखभाल व त्यांच्यावर उपचार करण्यास पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. रुग्णालय आतून अनेक समस्यांनी खिळखिळे असून, अपुर्या मनुष्यबळाअभावीच मनोरुग्णालयाची स्थिती भयावह झाली असल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून कर्मचारी भरतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित असून, विविध समस्यांच्या समितीच्या शिफारशीसुद्धा केवळ कागदोपत्रीच असल्याचे अधोरेखित झाले आहे.
समितीच्या शिफारशी…
-रुग्णांना स्वच्छतेसाठी लागणारे कपडे, पुरेसे पंखे, थंडीपासून संरक्षण होण्यासाठी हिटर.
-धार्मिक प्रार्थनेसाठी व्यवस्था, पुरेशा प्रमाणात महिला व पुरुष कर्मचार्यांची नेमणूक.
-कुटुंबीयांशी संपर्क व्यवस्था करणे.
-रुग्णालयाच्या आवारात पुनर्वसन केंद्र उभारणे.
-दीर्घकाळ वास्तव असलेल्यांचे ओळखपत्र व आधार कार्ड करावे.
-कायदेशीर मदत, वयोगटानुसार उपचारांची व्यवस्था करणे.
येरवडा मनोरुग्णालयात सध्याच्या घडीला १ हजार १३० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी काही रुग्ण गेल्या तब्बल बारा वर्षांपासून येथे राहात आहेत. येथे १२ वॉर्ड पुरुष रुग्ण, तर ९ वॉर्ड महिला रुग्णांसाठी कार्यरत असून, या दोन्ही रुग्णांच्या देखभालीसाठी प्रत्येक वॉर्डसाठी किमान पाच कर्मचार्यांची आवश्यकता आहे. सध्या ३६५ चतुर्थ श्रेणीतील वैद्यकीय कर्मचार्यांची आवश्यकता आहे. सफाई कामगारांच्या ६० टक्के जागा रिक्त आहेत. या रुग्णालयातील सुमारे १ हजार १३० रुग्णांच्या उपचाराची सर्वस्वी जबाबदारी येथील ४५ डॉक्टर्सच्या खांद्यावर आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येत कार्यरत असलेल्या रुग्णांची सेवा करण्यास डॉक्टर कमी पडत आहेत. यातील ५५ टक्के डॉक्टर्स आणि ६० टक्के सफाई व वैद्यकीय कर्मचार्यांची नव्याने भरती करण्यात यावी, यासाठी मनोरुग्णालय प्रशासनाकडून २०१९ पासून राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र, आजतागायत म्हणजे मे २०२२ पर्यंत हा प्रस्ताव राज्य शासनाकडे धूळ खात पडून आहे.
काही महिन्यांपूर्वी आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी येथील पाइपलाइन, अस्वच्छ जीवनशैली आणि प्रादेशिक मानसिक रुग्णालयातील रिक्त पदांच्या तक्रारींच्या अनुषंगाने येणार्या अनेक तपासण्या केल्या होत्या. त्यात बहुतांश वॉर्डामध्ये अस्वच्छ वातावरण असल्याचे दिसून आले. आजही मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कैद्यांना पाणी व वेळेवर वैद्यकीय उपचारांच्या सोयीसुविधा मिळत नसल्याने भांडणासारखे प्रकार घडत आहेत. ठिकठिकाणी कचर्याचे साम्राज्य पसरले असून, त्याचा येथील रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. येथे कचर्याची सफाई करण्यासाठी सफाई कर्मचार्यांची सध्या वानवा आहे. रुग्णालय प्रशासनाने कर्मचार्यांची संख्या वाढविण्यासाठी अनेक प्रस्ताव सादर केले आहेत. परंतु, विशेष निधी प्राप्त होत न शकल्याने रुग्णांच्या समस्यांत वाढ होत आहे.
समस्यांच्या अहवालाचा विचार नाही…
– राष्ट्रीय महिला आरोग्य आणि नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ मेंटल हेल्थ ऍन्ड न्यूरोसायन्सेसच्या वतीने २०१५-१६ मध्ये देशभरातील निवडक १० शासकीय मनोरुग्णालयाच्या परिस्थितीवर एक अहवाल तयार केला. देशातील सर्व राज्यांच्या आरोग्य सचिव तसेच प्रमुख आरोग्य अधिकार्यांची दिल्ली येथे यासंदर्भात एक परिषद झाली. या परिषदेत हा अहवाल तसेच उपाययोजनाची माहिती देण्यात आली. यात पुणे येथील येरवडा मनोरुग्णालयाचा समावेश होता. या अहवालात अपुरे कर्मचारी, रुग्णांना मिळणारे जेवन, वैयक्तिक स्वच्छता, झोपण्याची व्यवस्था, औषधोपचार तसेच मानसिक गरजांकडे किती लक्ष पुरविले जाते यांचा पंचनामा करण्यात आला. परंतू, या अहवालाचा शासनदरबारी आजतागायत गांर्भीर्याने विचार झालेला दिसून येत नाही.
रात्रीची सुरक्षा केवळ तीन कर्मचार्यावरच…
– गेल्या सहा वर्षी रुग्णालयात दोन रुग्णांचा खून झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेचे तीन-तेरा वाजले होते. संपूर्ण रुग्णालय प्रशासन खळबळून जागे झाले होते. त्यावेळी शासनाकडे अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेची मागणी करण्यात आली. परंतू, ही मागणी सुध्दा आजतागायत पूर्ण झाली नाहीत. रुग्णालयात सध्या १ हजार १३० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी रात्र पाळीला केवळ तीनच कर्मचारी नियुक्तीस आहेत. असे असूनही हे कर्मचारी आपल्या डयुटीचा बहुतांश वेळ आरामदायी वाडयांमध्ये घालवत असल्याचे सांगण्यात येते.
सध्या रुग्णालयातील प्रत्येक वैद्यकीय कर्मचार्यांची संख्या नगण्य आहे. अपुर्या मनुष्यबळामुळे कार्यरत असणार्या डॉक्टरांवरच कामाचा ताण येतो. राज्याच्या आरोग्य मंत्राकडे कर्मचारी भरतीचा पाठपुरावा केला आहे. रुग्णालयातील बरेच कामे पेंडिंग आहेत. प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे.
डॉ. लता पांढरे, वैद्यकीय अधीक्षक, (मनोरुग्णालय, येरवडा)