काँग्रेस अपोझिशनके रोल में ?

देर आये, दुरुस्त आये…
विनोद देशमुख, ज्येष्ठ पत्रकार
ऐसे नीडर नेताकी पार्टी पिछले आठ सालसे जनताके कितने सवाल लेकर रास्तेपर उतरी, यह भी बता देते, तो अच्छा होता ! भुलिए मत, अपोझिशनका रोल है आपका ! !
देर आये, दुरुस्त आय’ ही म्हण काँग्रेसच्या आजच्या आंदोलनाला लागू पडते! उशिरा का होईना, काँग्रेस नेतृत्वाला जाग आली, हेही नसे थोडके. महागाई असो की आणखी कोणते प्रश्न असो, सरकारला जाग आणणे आणि त्यासाठी जनआंदोलन उभारणे, हे विरोधी पक्षांचे कामच आहे. दुर्दैवाने, आपले विरोधी पक्ष ढेपाळलेले आहेत, असाच लोकांचा अनुभव आहे. विशेषत: प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस तर अक्षरश: गळपटलेला जाणवत आहे. त्यातून बाहेर पडून तो पुन्हा उभा राहणार असेल तर लोकशाहीसाठी ती चांगली गोष्ट आहे, असेच कोणताही लोकशाहीप्रेमी म्हणेल.
मात्र, काँग्रेसला आंदोलनाचे प्रशिक्षण घेण्याची गरज आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आठ वर्षांचे भाजप सरकार अपयशी ठरल्याचा काँग्रेसचा दावा असेल, तर इतके दिवस त्यांच्याविरुद्ध आंदोलन का केले गेले नाही, असा प्रश्न उद््भवतो. (त्याचा खुलासा पुढे केलेला आहे.) याचे मुख्य कारण हे की, लढण्याची मानसिकताच या पक्षाकडे नाही! स्वातंत्र्यानंतरचे पहिले अर्धशतक सतत सत्तेत राहिल्यामुळे असेल, पण या पक्षाचे नेते सुखलोलुप आणि कार्यकर्ते आळशी बनल्याने गेल्या पंचवीस वर्षांत काँग्रेसने आंदोलनात्मक कार्यक्रम राबविल्याचे कधी दिसले नाही. त्याच्याच परिणामी पक्षाला उतरती कळा लागली, जनमानसातील प्रतिमा धूसर होत गेली आणि लोकसभेत लागोपाठ दुसऱ्यांदा दहा टक्केही जागा जिंकता न आल्याने विरोधी पक्षनेतेपदही मिळू शकले नाही! ही दुरवस्था संपायची असेल तर लोकांमध्ये जावे लागते, त्यांच्या प्रश्नांसाठी सरकारशी संघर्ष करावा लागतो. विरोधी पक्षाचे हे कामच काँग्रेस विसरली, असे वाटून जाते.
याउलट, आजचे सत्ताधारी असलेली भाजप जनसंघाच्या काळापासून अशी आंदोलने नेटाने करीत असल्याचा इतिहास आहे. नागपूरचेच उदाहरण घ्या.
सुमतीबाई सुकळीकर आपल्यासारख्याच पाचपंचवीस गृहिणींना सोबत घेऊन झाशी चौक गाठायच्या आणि महागाईच्या निषेधार्थ झाशीच्या राणीच्या आवेशात अशा ताटे बडवायच्या की, साऱ्या नागपूर शहराचे आकाश दुमदुमून जायचे! असे किंवा अशा प्रकारचे काँग्रेसचे आंदोलन गेल्या आठ वर्षांत कोणी पाहिले? त्याआधीची दहा वर्षे तर संपुआचीच सत्ता असल्याने आंदोलनाचा प्रश्नच नव्हता. लोकांमध्ये अस्तित्व टिकविण्यासाठी हे आवश्यक असते. ही गोष्ट आता उशिराने समजली असेल तरी हरकत नाही.
पण, असे समजून उमजून आजचे आंदोलन झाले असण्याची शक्यता कमीच! मध्यंतरी पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ अनेकदा झाली, जीवनावश्यक वस्तूंचे भावही वाढले. त्या त्या वेळी आंदोलन करण्याचे काँग्रेसला सुचले नाही आणि आज एकदम महागाई आठवली ? यामागे नॅशनल हेराॅल्ड प्रकरण असण्याचीच शक्यता अधिक आहे. यात सोनिया आणि राहुल गांधी यांची ईडी चौकशी झाली. हेराॅल्डची मालमत्ता हडपण्याचा आरोप असलेल्या वादग्रस्त यंग इंडियाच्या कार्यालयाला सील लावण्यात आले. यातून भविष्यातील मोठ्या कारवाईचे संकेत मिळू शकतात.
या पार्श्वभूमीवर हे आंदोलन झाले आहे. जनतेसाठी कमी आणि नेत्यांसाठी जास्त, असे आजच्या आंदोलनाचे स्वरूप आहे, असे कोणी म्हटले तर त्याला दोष देता येईल का? काँग्रेसच्या पतनाला घराणेशाही एक प्रमुख कारण आहे, हे कधी समजून घेणार हे लोक?
आजच्या पत्रपरिषदेत राहुल गांधी म्हणाले- “जो डरते है वो धमकाते है और जो धमकाते है वो डरते है ! म्हणजे, मोदींसह जे चार प्रमुख नेते सध्या देश चालवतात (असा राहुल गांधींचा दावा आहे.) ते लोकांना घाबरतात. त्यामुळेच खरं बोलणाऱ्यांना ते त्रास देतात. हम डरते नही, इसलिए सच बोलते है !