काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष असेल : नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणुकांबाबत भाष्य केलं आहे. तसंच या निवडणुकांध्ये काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष असेल, असं म्हणत मित्रपक्षांसह विरोधकांना इशारा दिला आहे.
‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग हा फक्त मोझरी परिसरातच नव्हे तर संपूर्ण देशभरात आहे. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण वाटचाल करू. महाराष्ट्रात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत येईल आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचा आधार घेऊनच ते सरकार काम करेल,’ असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विदर्भ दौऱ्यावर असून आज अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना पटोले पुढे म्हणाले की, विदर्भाच्या दौऱ्यात आपण कष्टकरी, कामकरी, शेतकरी, गरिबांच्या व्यथा पाहिल्या आहेत. करोनामुळे या लोकांचे जगणे अवघड झालं आहे. एकीकडे करोनाशी सामना तर दुसरीकडे जगण्याची धडपड सुरु आहे. केंद्रातील मोदी सरकारने लोकांना जाणीवपूर्वक मरणाच्या दारात आणून ठेवले आहे. ऑक्सीजन, रेमडेसीवर या औषधांचा पुरवठा केंद्र सरकार करते, तो वेळेवर व पुरेसा न केल्यामुळे हजारो लोकांचे जीव गेले. आताही बुरशी आजारावरचे इंजेक्शन केंद्राकडून वेळेवर व पुरेशा प्रमाणात मिळत नाही. शेतकरी सहा महिन्यापासून आंदोलन करत आहेत पण पंतप्रधान मोदींना या शेतकऱ्यांशी बोलावयास वेळ नाही. भाजपचे सरकार देशाला अधोगतीकडे घेऊन गेले आहे. काँग्रेसचा विचारच या देशाला वाचवू शकतो, संविधानाला वाचवू शकतो असंही ते म्हणाले.