प्रतिआराखडा सरकारला सादर
l टोकन दर्शनातून गर्दीचे विकेंद्रीकरण
l निरुपयोगी जागा उपयोगात आणण्याचे प्रस्ताव
l भजन, आरोग्य सुविधा, संत चरित्र यांसाठी जागा
पंढरपूर : शासनाच्या मालकीच्या असणाऱ्या परंतु उपयोगात नसणाऱ्या जागा आणि इमारतींचा वापर करून वारकरी सोयी-सुविधा निर्माण करत कुठलीही पाडापाडी न करणारा विकास आराखडा आज तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सादर करण्यात आला.
गेल्या महिनाभरापासून मोठा गाजावाजा झालेल्या या प्रतिआराखड्यामध्ये मंदिर परिसरातील शासकीय मालकीच्या जागांना व्यापारी आणि वारकरी हिताच्या केंद्रांकरिता आरक्षित करण्याची सोय दाखविण्यात आली आहे. तसेच कुठलेही पाडकाम न करता असलेले रस्ते अतिक्रमणमुक्त करून तेच भव्य-दिव्य करावेत तसेच वारकऱ्यांची पदस्पर्श दर्शन रांग हा प्रकार बंद करून टोकन सिस्टीम यंत्रणा राबवावी आणि येथील गर्दीचे विकेंद्रीकरण व्हावे असा प्रमुख बदल यात सुचविण्यात आला आहे.
शासनाच्या मालकीच्या असलेल्या लोकमान्य विद्यालय, टिळक स्मारक मंदिरातील जवळची जागा, जिजामाता उद्यान, रुक्मिणी पटांगणामधील जागा, जुनी नगरपालिका, नगर वाचन मंदिर, वाळवंटातील काही भाग, दर्शन मंडप, तुकाराम भवन, ६ नंबर शाळा, बेघर वसाहती जवळील इमारत अशा अनेक निरुपयोगी ठरलेल्या जागा पूर्ण क्षमतेने उपयोगात आणण्याचे प्रस्ताव त्यामध्ये देण्यात आले आहेत.
प्रारंभिक स्वरूपामध्ये अत्यंत सुटसुटीत आणि गर्दीचे विकेंद्रीकरण करत वारकऱ्यांना सर्व त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणारा हा आराखडा असल्याचे मत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले. जिल्हाधिकाऱ्यांना आराखडा सादर केल्यानंतर दिवसभर सोशल मीडियावरून हा आराखडा आणि त्याच्या सादरीकरणाच्या क्लिपिंग फिरत होत्या. त्यावरून अनेकांनी समाधान व्यक्त केले तर अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनीदेखील याला प्रोत्साहन दिल्याचे दिसते.
निरुपयोगी ठरलेल्या मंदिर परिसरातील जागांमध्ये वारकरी सेवा केंद्र, आरोग्य सुविधा, १० बेडचे हॉस्पिटल, प्रथमोपचार केंद्रे आदी बाबी खूबीने सुचविण्यात आलेल्या आहेत.
प्रामुख्याने प्रशासनाची डोकेदुखी होती ती गर्दीच्या विकेंद्रीकरणाबाबत. यामध्ये महत्त्वपूर्ण प्रस्ताव देण्यात आलेले आहेत. संपूर्ण गर्दी मंदिर परिसराच्या बाहेरील बाजूला विकेंद्रीत करावी, टोकन सिस्टीम केल्याने ज्या लोकांना दर्शन घ्यायचे आहे तेच लोक आणि भाविक मर्यादित कालावधीसाठी मंदिर परिसरात यावेत, इतर वेळेस ते मंदिर परिसरातून बाहेर जावेत आणि त्या ठिकाणी त्यांचा रहिवास असावा अशा पद्धतीचे नियोजन त्यामध्ये करण्यात आलेले आहे.
प्रदक्षिणामार्गाच्याबाबत देखील महत्त्वपूर्ण नियोजन करण्यात आले असून संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग भव्य-दिव्य करण्याबाबत प्रस्ताव देण्यात आलेला आहे. यामध्ये देखील कुठलेही पाडकाम न करता अतिक्रमणमुक्त असा हा मार्ग करावा असे सुचविण्यात आले आहे.
महाद्वार, शॉपिंग सेंटर, जुनी इमारत अशा अनेक ठिकाणी लहान-मोठे गाळे बांधून लहान उद्योजकांना तसेच मंदिर परिसरातील फेरीवाल्यांना कायमस्वरूपी पुनर्वसन करावे आणि त्या ठिकाणी त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटावा असा प्रस्ताव यात देण्यात आला आहे. प्रारंभिक स्वरूपात अवघड वाटणारे पुर्नस्थापन करण्यापेक्षा आहे त्या जागांमध्ये त्यांचे लहान लहान उद्योग घटक निर्माण करून द्यावेत आणि त्या ठिकाणी त्यांचे व्यापार-उदिम चालावा असा प्रस्ताव देण्यात आला आहे.
बहुमजली भजन, कीर्तनाचे हॉल, जिजामाता उद्यानमध्ये संत चरित्राचे सादरीकरण, अध्यात्मिक भिंती असे अनेक प्रस्ताव यामध्ये सुचविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मंदिर समितीच्या वतीने देखील केलेल्या अतिक्रमण केंद्र असलेल्या लाडू सेंटर, सामान ठेवण्याची सुविधा अशावर देखील यामध्ये बोट ठेवण्यात आले आहे. ही सर्व अतिक्रमणे काढून टाकण्याचे देखील प्रस्ताव यामध्ये आहेत, तसेच चौफाळा ते पश्चिमद्वार असा रस्ता हा दुतर्फा कमानीच्या माध्यमातून सुशोभित करण्याचा देखील प्रस्ताव यामध्ये देण्यात आला आहे.