अवैध हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा; १० जणांवर गुन्हा दाखल

मुंढवा : मुंढवा परिसरात अमली पदार्थ विरोधी पथक -१ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी अवैध हुक्का पार्लरवर छापा टाकून कारवाई केली. अमली पदार्थ विरोधी पथक १ कडील पोलिस अधिकारी व अंमलदार यांची दोन पथके तयार करून मुंढवा हद्दीत पेट्रोलिंग करीत आहेत. या अंतर्गत हॉटेल बॉटल फॉरेस्ट ताडीगुत्ता चौक धायरकर वस्ती मुंढवा पुणे व हॉटेल ब्ल्यू शॅक धायरकर कॉलनी, पिंगळे वस्ती मुंढवा पुणे येथे सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा १ च्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १० जणांवर गुन्हा दाखल करून ७८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. पोलिसांनी हॉटेल बॉटल फॉरेस्टचे मालक रोहित किसन (वय २९, रा. घोरपडी गाव), हॉटेल व्यवस्थापक देवराम मांगिलाल जैन (वय ३२, रा. रविवार पेठ), वेटर सरोज लालमुखीया कुमार (वय १९, रा. पाषाण), गोविंद सुरेंद्र मुखीया (वय १९, रा. मुंढवा), पवन मुखीया जोगिंदर मखीया (वय २२, रा. मुंढवा) ग्राहकांना अवैधरीत्या हुक्का पुरवून त्या ठिकाणी हुक्का बार चालवत होते. त्यांच्याकडून ३३ हजार तीनशे रुपयांचे हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट इ. साहित्य जप्त करण्यात आले. तसेच हॉटेल ब्ल्यू रॉक या हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत हॉटेल चालक अभय दिवाकर मिश्रा (वय ४१, रा. कु पश्चिम), ग्राहकांना सर्व्हिस देणारे अशोककुमार गाड (वय २२, रा. धायरकर वस्ती, ताडीगुत्ता, पुणे), गोल निहरी रामकुमार (वय २०, रा. धायरकर वस्ती, पुणे, मूळ रा. उत्तर प्रदेश), बाबू कालू शेख (वय २८, रा. धायरकर वस्ती, पुणे मूळ रा. उडीसा), भरत उत्तीमलाल कामत (वय ३९, रा. धायरकर वस्ती, पुणे मूळ रा. बिहार) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी हे ग्राहकांना तंबाखूजन्य पदार्थासह हुक्का पुरवित होते. ही कारवाई पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे १ गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, महिला सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर, पोलिस अंमलदार संदीप जाधव, संदीप शिर्के, प्रवीण उत्तेकर, चेतन गायकवाड, रेहाना शेख, विश्व दळवी, पांडुरंग पवार, राहुल जोशी, मारुती पारधी, नीतेश जाधव यांच्या पथकाने केली.