महाराष्ट्ररणधुमाळी

देवेंद्र फडणवीसांनीच आम्हाला संरक्षण दिले

दीपक केसरकर यांची कबुली

संजय राऊतांनी राजीनामा द्यावा…
संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना केसरकर म्हणाले की, शिंदे गटाच्या आमदारांचा राऊत यांच्याबद्दल राग आहे. आम्ही जे निवडून आलो ते भाजप-शिवसेना युतीच्या जिवावर आलो आहोत. राऊत यांच्यासारखे प्रवक्ते कोणत्याही पक्षाला मिळू नयेत, असे दीपक केसरकर म्हणाले. एकनाथ शिंदे यांना राऊत रिक्षावाला म्हणतात, पण त्याच रिक्षावाल्याने शिवसेनेचा एक विभाग सांभाळला, ठाण्यातील सत्ता शिवसेनेला मिळवून दिली, असेही दीपक केसरकर म्हणाले. त्यामुळे अशी भाषा वापरणार्‍या संजय राऊतांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

गुवाहाटी/मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध चांगले असून आम्ही एकटे पडलो असताना फडणवीसांनीच आपल्याला संरक्षण दिले असल्याची कबुली दीपक केसरकरांनी दिली आहे. महाराष्ट्रात लवकरात लवकर येण्यासाठी प्रयत्न केला जाईल. फ्लोअर टेस्ट घ्या, त्यावेळी आमची भूमिका मांडू. आज जे काही महाराष्ट्रात सुरू आहे ते इमोशनली ब्लॅकमेलचा प्रकार आहे, असेही ते म्हणाले.देवेंद्र फडणवीसांनी स्वत:हून आम्हाला संरक्षण दिले.

बंडखोर आमदारांच्या वतीने बाजू मांडताना दीपक केसरकर म्हणाले की, माझे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले
संबंध आहेत. रात्री १२ वाजताही फडणवीस माझा फोन उचलतात. आज जर आम्ही एकटे पडलो तर त्यांच्याकडे मदत मागितली तर त्यात काय बिघडले. फडणवीसांनी स्वत:हून आम्हाला संरक्षण दिले. भाजपशासित राज्यात आम्हाला संरक्षण मिळत आहे.

पवारांनी तीन वेळा शिवसेना फोडली
दीपक केसरकर म्हणाले की, राऊतांच्या वक्तव्यामुळे मोदी आणि ठाकरे यांचे संबंध बिघडत आहेत. शरद पवारांनी तीन-तीन वेळा शिवसेना फोडली. शिवसेनेचा आमदार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या राष्ट्रवादीच्या पडलेल्या उमेदवाराला ताकद दिली जातेय. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना त्यांच्यावर विश्वास होता, पण ते आता शिवसेना संपवत आहेत. सत्ता जाऊ नये, म्हणून राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पणाला लावण्यात येत आहे. आम्ही भाजपमध्ये विलिन होणार, असे म्हटले जात आहे, पण या अफवा आहेत.

शिंदेच आमच्या गटाचे नेते
एकनाथ शिंदे हेच आमच्या गटाचे नेते असल्याचा पुनरुच्चार दीपक केसरकर यांनी केला. आमच्या भावनेचा अंत पाहू नका, यापुढे जशास तसे उत्तर देऊ, अशी निर्वाणीची भाषा केसरकरांनी वापरली. फडणवीस-ठाकरे यांच्यातील चर्चेकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो, असे दीपक केसरकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये