“उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं तेव्हापासून…”, श्याम देशपांडेंच्या पक्षप्रवेशावेळी फडणवीसांचा हल्लाबोल

पुणे : (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray) पुण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक श्याम देशपांडे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
फडणवीस म्हणाले, “शाम देशपांडे हे कट्टर शिवसैनिक होते. पण जेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं, तेव्हापासून श्याम देशापांडेसारखे सच्चे शिवसैनिक दुखावले गेले. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयसेवक संघावर टीका केली, तेव्हा शिवसेना सोडणारे पहिले व्यक्ती श्याम देशपांडे होते. उद्धव ठाकरे जर संघावर टीका करत असतील, तर मी शिवसेनेत राहू शकत नाही, ते त्यांनी ठणकावून सांगितलं होतं”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
श्याम देशपांडे हे २०००-२०१२ या कालावधीत कोथरूडचे शिवसेनेचे नगरसेवक होते. तसेच ते २००८ ते २००९ दरम्यान ते पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपददेखील होते. दरम्यान, देशपांडे यांच्या या पक्षप्रवेशाने शिवसेनेला कोथरुडमध्ये खिंडार पडलं आहे. मे 2022 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देशपांडे यांनी थेट टीका केल्यानंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.