मंत्रिमंडळ विस्तारानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “महिला मंत्री नाही हा…”

मुंबई | Devendra Fadnavis Reaction On Cabinet Expansion – आज नवीन मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. राजभवनातील दरबार हाॅलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र यामध्ये एकाही महिला आमदाराचा समावेश नसल्यानं महाविकास आघाडीकडून सडकून टीका करण्यात आली आहे. हा आरोप करणाऱ्यांना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मंत्रिमंडळ होत नाही म्हणून काही लोक बोलत होते. तसंच विस्तार झाला की सरकार पडेल असंही काही लोक म्हणत होते. आता विस्तार झाला सरकारही मजबूत आहे. त्याचबरोबर महीला मंत्री नाही हा आरोप लवकरच दूर होईल. महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात मिळेल. आधीच्या सरकारने जेव्हा विस्तार केला तेव्हा त्यांच्याकडे पण महिला मंत्री नव्हत्या. त्यामुळे त्यांना हे बोलायचा काहीही अधिकार नाही”.
दरम्यान, ज्या पक्षाचे दोन मंत्री आरोपाखाली जेलमध्ये असतील आणि अनेक नेत्यांवर खटले सुरू असतील अशा पक्षाला सोशल मीडियावर आमच्या मंत्र्यांची यादी टाकण्याचा नैतिक अधिकार आहे का? आधी त्यांनी आरसा पाहावा आणि त्यानंतर ट्विट करावं, अशा शब्दांत फडणवीसांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं आहे.