पीएफआयवरील बंदीनंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हा एक सायलेंट…”

मुंबई | Devendra Fadnavis Reaction On PFI Ban – गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि इतर काही संघटनांवर केंद्र सरकारनं 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. पीएफआय संघटनेवर दहशतवादी आणि देशविरोधी कारवाया केल्याचा ठपका तपास यंत्रणांनी ठेवला आहे. तपास यंत्रणांनी पीएफआयच्या कारवाया लक्षात घेऊन या संघटनेवर बंदी घालण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाला केली होती. त्यामुळे गृहमंत्रालयाने त्यावर आध्यादेश काढत बंदी घातली आहे. या संदर्भात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्याला माहिती आहे की लोक दहशतवादी कृत्य करून देशाचे वातावरण बिघडवत आहेत. त्याचबरोबर काही लोक देशात तेढ निर्माण करण्याचे काम करत होते. त्यामध्ये पीएफआय देखील होते. पीएफआय हा एक सायलेंट किलर होता. पीएफआयशी संबंधित इतर 6 संस्थांवरही बंदी घातली आहे. या संस्थांचे आणखी काही कनेक्शन आहेत का ते पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर बाकी त्यांच्या संस्थांचा इतर संस्थांशी संबंध आहे का? किंवा पैशाचे काही व्यवहार झाले आहेत ते कोणत्या खात्यातून झाले आहेत हे सर्व पडताळून पाहिले जाईल त्यानंतरही दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशातून सर्वात आधी केरळने पीएफआय संघटनेवर बंदी घाला अशी मागणी केली होती त्यानंतर विविध राज्यातून ही मागणी झाली होती. पीएफआय संबंधी सर्व गोष्टीचे पुरावे उपलब्ध आहेत यामुळे केंद्र सरकारने बंदी घातली आहे. दरम्यान राज्यात देखील या लोकांनी विविध ठिकाणी लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला होता, असंही फडणवीस म्हणाले.