किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “त्या माणसाचं…”
मुंबई | Devendra Fadnavis – भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर किरीट सोमय्या वादात सापडले आहेत. त्यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांकडून टीका केली जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं आहे.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या जो विषय मांडला आहे तो खूप गंभीर आहे. राजकारणात असे अनेक प्रसंग येत असतात. यामध्ये मग त्या माणसाचं राजकीय आयुष्य पणाला लागतं. तसंच या प्रकराणातील पुरावे माझ्याकडे द्या. मी कोणालाही पाठिशी घालणार नसून या प्रकरणाची चौकशी आम्ही करू. आम्ही कोणालाही पाठिशी घालणार नसून हे प्रकरण दाबलं जाणार नाही.”
दरम्यान, या प्रकरणानंतर किरीट सोमय्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. सोमय्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही. मी देवेंद्र फडणवीस यांना अशा आरोपांची व्हिडीओची सत्यता तपासावी आणि चौकशी करावी अशी विनंती केली आहे. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे.” त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करावी अशी विनंती त्यांनी गृहमंत्री फडणवीस यांना केली आहे.