ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“आमच्याजवळ भरपूर बाॅम्ब आहेत पण…”, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर

नागपूर | Devendra Fadnavis On Uddhav Thackeray – आजचं (27 डिसेंबर) विधिमंडळ अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजपच्या आमदारांनी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालयास भेट दिली. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी संवाद साधताना काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) विधानपरिषदेत शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेला खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सीमाप्रश्नावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठराव मांडतील. मला विश्वास आहे की तो ठराव आपण एकमतानं मंजूर करू. फक्त काल बोलणाऱ्यांचं मला आश्चर्य वाटलं की ते अडीच वर्ष मुख्यमंत्री होते, तरीही त्यांनी काहीच केलं नाही. आमचं सरकार आल्यावर सीमाप्रश्न निर्माण झालेला नाही. महाराष्ट्राच्या निर्मितीपासून किंवा भाषावार प्रांतरचना तयार झाली तेव्हापासून सीमाप्रश्न आहे. तेव्हापासून वर्षानुवर्षे ज्यांची सरकारं आहेत, ते आता असं भासवत आहेत जणूकाही हे सरकार आल्यानंच सीमाप्रश्न तयार झालाय”.

“सीमाप्रश्नावर अशाप्रकारचं राजकारण कधीच झालं नाही. अनेक वर्ष आम्ही विरोधात होतो, पण सरकारच्या पाठीशी ताकदीनं उभा राहिलो. कारण मराठी माणसाचा प्रश्न आहे. सीमावर्ती भागातील प्रत्येकाला हे वाटलं पाहिजे की, आमच्या पाठीशी उभा महाराष्ट्र आहे. राजकारण करायला शंभर गोष्टी मिळतील, त्यामुळे आम्ही कधी केलं नाही. आमची अपेक्षा आहे की अशाप्रकारचं राजकारण यामध्ये करण्यात येऊ नये. सीमावर्तीयांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र आहे, हाच भाव गेला पाहिजे”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांबाबत मोठे बॉम्ब फोडण्याचा सूचक इशारा दिला. यानंतर काल (26 डिसेंबर) उद्धव ठाकरे यांनी त्यावर विधान भवन परिसरात आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत, त्यांच्या वाती काढल्या आहेत, फक्त त्या पेटवण्याचा अवकाश आहे, असं विधान केलं होतं. यावर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“कुठलही प्रकरण काढायचं, त्यावर हंगामा करायचा आणि उत्तर घ्यायचं नाही. अशाप्रकारचा प्रयत्न दिसतोय. हे जे बॉम्ब, बॉम्ब म्हणत आहेत ते लवंगी फटाकेदेखील नाहीत. आमच्याजवळ भरपूर बॉम्ब आहेत, ते कधी काढायचे आम्ही ठरवू पण आता सध्या यांचे लवंगी फटाके काय आहेत, ते आम्ही बघू”, असंही फडणवीस म्हणाले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये