नाराज हार्दिक पटेल काँग्रेसला देणार मोठा धक्का!
गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन टेकल्या आहेत. त्यापुर्वीचं काॅंग्रेसला मोठा झटका बसणार असल्याची माहिती समोर येत आहे. पाटीदार आंदोलनाच्या माध्यमातुन राजकारणात आलेले, मागिल वर्षीच काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणारे, सध्याचे गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी प्रदेश काँग्रेस नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यावरुन हार्दिक पटेल यांची बंडखोर वृत्ती समोर येत आहे. हार्दिक यांनी स्वत:ला राम भक्त आसल्याचे सांगितले आहे. आम्हाला हिंदू असल्याचा अभिमान आहे, पण भाजपमध्ये प्रवेशबाबत त्यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही.
हार्दिक यांनी राज्य नेतृत्वाबाबतची आपली बाजू काँग्रेस हायकमांड समोर मांडली आहे. दिल्लीत त्यांनी काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाशी माझी कोणतीही अडचण नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. गुजरातमधील जनतेचा आवाज उठवता येत नाहीय, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
गुजरात काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वानं हार्दिक पटेल यांना जाहीरपणे बोलू नका आणि अंतर्गत प्रकरणावर वैयक्तिक चर्चा करू नका, असा इशाराही दिला आहे. यानंतरही हार्दिक राज्य नेतृत्वाबाबत सातत्यानं वक्तव्ये करत आहेत. जनतेच्या प्रश्नांवर विरोधकांना सरकारच्या विरोधात लढा आणि संघर्ष करावा लागेल, असं हार्दिक पटेल म्हणाले. आपण तसे करू शकलो नाही तर लोक इतर पर्याय शोधतील. गुजरातमध्ये भाजप मजबूत आहे. कारण, त्यांच्याकडं नेतृत्व आहे आणि ते वेळीच योग्य निर्णय घेतात. मात्र, माझा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा कोणताही विचार नसल्याचं हार्दिक पटेल यांनी स्पष्ट केलं.