का रे बा रुसलास! वरुणराजाची हुलकावणी

विजय कुलकर्णी
एकीकडे राज्यात सध्या सत्तापरिवर्तनाची लाट आली असली तरी दुसरीकडे बळीराजा मात्र चांगलाच धास्तावला आहे. जुलै उजाडला तरी अजूनही वरुणराजा बरसलाच नाही. गेल्या ३-४ वर्षांत जूनपासूनच मनसोक्त बरसणाऱ्या वरुणराजाने यंदा जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे राज्यातील धरणांनी तळ गाठला आहे. काही जिल्ह्यांत आकाशात ढगांनी गर्दी केल्याने वरुणराजा बरसेल, अशी चिन्हे दिसतात, प्रत्यक्षात वरुणराजाने चांगलीच हुलकावणी दिल्याने सर्वांचाच भ्रमनिरास होतो. सध्या दुष्काळग्रस्त ग्रामीण भागात अधिक चिंता व्यक्त होत आहे. यंदाच्या मान्सून हंगामात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र तो साफ चुकीचा ठरला आहे. जून महिन्याचा पहिला पंधरवडा वगळता समाधानकारक पाऊस झाला नाही. दुबार पेरणी झाल्यामुळे पिकांची वाढ समाधानकारक झाली नाही. पेरणीनंतर पिकांची उगवण तर झाली, मात्र अनेक आठवड्यांपासून पाऊस लांबल्याने खरीप पिकांतून मिळणाऱ्या उत्पन्नावर थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या दिवसेंदिवस वरुणराजा हुलकावणी देत असल्याने शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून मान्सूनपूर्व पेरणी करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांंवर दुबार पेरणी करण्याचे संकट उभे ठाकले आहे.
दुष्काळाच्या झळांचा सामना केल्यानंतर यंदा चांगला व वेळेवर पाऊस होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांंना होती, परंतु जून महिना संपत आला तरी काही भाग वगळता समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. चांगला पाऊस होईल व पेरता येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे, परंतु वार्षिक पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत मोठी तूट आली आहे. पेरणीसाठी किमान ७५ मिमी पाऊस आवश्यक असून, शेतकरी आता वरुणराजाची कृपा कधी होते, या प्रतीक्षेत आहेत. केवळ आकाशात ढगांची गर्दी होऊन पाऊस पडण्याच्या आशा पल्लवित होतात. प्रत्यक्षात पाऊस पडत नसल्याने दुष्काळी भागात काळजीचे वातावरण दिसून येते. शेतकऱ्यांची शेतातील कामांची लगबग पाऊस पडेल, या आशेवर सुरूच आहे.
पावसाअभावी आता कामे रखडली आहेत. असे असताना आता पुण्यातील भोर तालुक्यातील भाटघर धरण क्षेत्रात अजूनही पाऊस झालेला नाही. या धरणावर अनेक शेतकऱ्यांचे पीक अवलंबून आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सध्या धरणातील पाण्याची पातळी ही झपाट्याने कमी होऊ लागली आहे. धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. सध्या धरणात केवळ ८ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे अजून काही दिवस पाऊस नाही पडला तर अडचणी निर्माण होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष लागले आहे. या धरणावर अनेक शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे. सध्या पाऊस गायब झाला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मान्सून वेळेच्या अगोदर दाखल होईल, असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला होता, परंतु जून महिना संपला तरी राज्यात पाऊस नसल्याने राज्यातील धरणांच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे.
जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली असल्याने धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे धरणात ठिकठिकाणी गाळ दिसू लागला आहे. बहुतांश छोट्या-मोठ्या धरणांतील पाणीपातळी खालावल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दिवसेंदिवस धरणांतील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे बळीराजाचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत. पाऊस नसल्याने जिल्ह्यातील पेरण्याही रखडल्या आहेत. ही धरणे ऑगस्टपर्यंत तरी भरणार का, असा प्रश्न बळीराजाला सतावत आहे.
शेतकऱ्यांसाठी भारतीय हवामान विभागाने एक अत्यंत महत्त्वाची सूचना दिली असून, त्यांनी पावसाचा अंदाज सांगितला आहे. जुलै महिन्यात नैर्ऋत्य मान्सूनचा पाऊस सामान्य राहील, असे सांगण्यात येते. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जोरदार पाऊस पडेल, असेही हवामान विभागाने सांगितले आहे. देशातील शेतकरी सध्या खरीप हंगामाच्या पेरण्या करण्यामध्ये व्यस्त आहेत. एका अंदाजानुसार पाहिले गेले तर जवळपास २० कोटी शेतकरी खरीप हंगामातील पिकांची लागवड करीत आहेत. जसे की, धान, सोयाबीन, कापूस, मका, मूग, भुईमूग, उडीद आणि तूर. खरीप हंगामातील पिके ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे पाऊस जर सामान्य असेल तर शेतकऱ्यांना कमी खर्च येतो, कारण या पिकांना जास्त पाण्याची गरज नसते. जुलै महिन्यात पाऊस सामान्य राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने लावला असून, ऑगस्ट महिन्यातील पावसाचा अंदाज जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला सांगितला जाईल, असे सांगण्यात येते. यावर्षी मान्सूनचा पाऊस दोन दिवस उशिरा पोहोचला, परंतु नंतर मान्सूनने वेगाने गती पकडली. अगदी येणाऱ्या आठ ते दहा दिवसांत देशातील विविध भागांत मान्सूनने आगमन केले. पण लगेच आपला जोर मान्सूनने आवरला. ८ जुलैपासून बंगालच्या खाडीवरून पुन्हा वारे वाहायला सुरू होईल, त्यामुळे ८ जुलैनंतर पुन्हा मान्सून दाखल होईल. पावसाने पाठ फिरवली असल्याने जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा खाली होऊ लागला आहे. त्यामुळे बहुतांश धरणे २० टक्क्यांपेक्षा खाली आली आहेत. साठा दिवसेंदिवस कमी होत असताना अपेक्षित पाऊस पडत नसल्याने साऱ्यांची चिंता वाढली आहे. ही धरणे केव्हा भरणार, हीच विवंचना बळीराजाला लागून राहिली आहे.